Girish Mahajan : नोटबंदीमध्ये तुम्ही काय धंदे केले हे सर्व मला माहिती, महाजनांचा खडसेंना इशारा

गिरीश महाजन

जळगाव : जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीवरुन सध्या वातावरण पेटले आहे. गेली काही दिवस एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू आहे. यातच गिरीश महाजन यांनी खडसेंना लक्ष्य केले असून नोटबंदीच्या काळात तुम्ही काय धंदे केले, हे सर्व मला माहिती असून, बोलण्यास भाग पाडू नका, असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेरातील बाबाजी राघो मंगल कार्यालयात मतदारांचा प्रचार मेळावा झाला. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. मेळाव्यातील भाषणात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे माझ्यावर आरोप करतात. मात्र माझ्याकडे बोट दाखवताना चार बोटे त्यांच्याकडेच आहेत. नोट बंदीच्या काळात त्यांनी काय काय केलं कुठे कुठे आणि कशा कशा नोटा बदलल्या हे सर्व मला माहीत आहे. मात्र ते बोलायला लावू नका असा थेट इशारा महाजन यांनी खडसे यांना दिला.

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नगराध्यक्ष पद स्वीकारले…

दूध संघामध्ये तुम्ही काय काय केले आहे हे सर्वजण जाणून आहे. सत्तेचा गैरवापर हा बरा नसतो असा टोला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना नाव न घेता लगावला. तुम्ही दूध संघामध्ये निवडून येऊन दाखवाच असे आव्हानही त्यांनी केले. खडसे हे त्यांच्या नशिबाचे भोग भोगणार आपण काय काय करून ठेवले आहे हे लवकरच कळेल. धमक्याच्या माध्यमातून आपणच सर्व पदे आपल्या घराण्यात ठेवले. तुम्ही काय माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करताय कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नगराध्यक्ष पद स्वीकारले आहे.

खडसेंनी परिवाराचा स्वार्थ जोपासला- आ. चव्हाण

आ.खडसे यांनी वयाचे भान ठेवून बोलायला हवे. आपल्यात मी पणा असल्यामुळे तुम्ही काय शेतकऱ्यांचा विचार करणार. परिवाराचे स्वार्थ पाहायचे असेल तर फॅट कसे बरोबर येणार असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, छगन झाल्टे, दिलीप खोडपे,तुकाराम निकम, एडवोकेट शिवाजी सोनार, जे के चव्हाण, बाबुराव हिवराळे, आतिश झाल्टे, उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी तर आभार अरविंद देशमुख यांनी मानले.

हेही वाचा :

The post Girish Mahajan : नोटबंदीमध्ये तुम्ही काय धंदे केले हे सर्व मला माहिती, महाजनांचा खडसेंना इशारा appeared first on पुढारी.