Gulabrao Patil : ..तर राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन केले असते

मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आता आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही गुलबाराव पाटील यांनी व्यक्त केला.

यावर पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, २०१९ साली राष्ट्रवादीने भाजपाबरोबर शपथ घेतली होती. कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते, तशीच ती सकाळ होती. शिंदे गटाने हा उठाव केला नसता, तर राष्ट्रवादीने भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली असती, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. यावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

दरम्यान, पक्ष सोडणे गैर नाही, परंतु ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली. त्यासोबत गद्दारी करणं चुकीचा आहे, असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. यावर अजित पवारांना गुलाबराव पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे, आम्ही मूळ शिवसेना आहोत, बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे, आम्ही भाजपमध्ये गेलो का, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यापद्धतीने आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळाले आहे. आम्ही पक्षांतर केलेले नाही, जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.

शिर्डीतील राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन झाल्यावर सरकार कोसळेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे अधिवेशन संपलं आहे, पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा तसेच आमदारांमध्ये फूट पडू नये, म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितलं जात असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केलं. आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा :

The post Gulabrao Patil : ..तर राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन केले असते appeared first on पुढारी.