Igatpuri Rave Party : इगतपुरीच्या रेव्ह पार्टीमधून Marathi Bigg Boss फेम Heena Panchal ताब्यात

नाशिक : मराठी बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री हिना पांचाळच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी हिना पांचाळसह 22 जणांना अटक केली आहे. यात परदेशी महिलेसह बारा महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या रक्ताचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणी ड्रग्स आणि इतर पदार्थांचं सेवन केलं होतं ते स्पष्ट होईल.

नाशिक पोलिसांनी इगतपुरीमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर रविवारी (27 जून) पहाटे छापा टाकत एकूण 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह दक्षिण आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील काहींचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे घटनास्थळावरुन पोलिसांनी ड्रग्स आणि इतर साहित्यही ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही ड्रग्सचे मुंबई कनेक्शन समोर आले असून इगतपुरी हा रेव्ह पार्टीचा अड्डा बनलाय का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

इगतपुरी परिसरातील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिलावर शनिवारी रात्री पार्टी सुरु होती ज्यात 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांचा समावेश होता. रविवारी पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबत टिप मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पथकासह इथे छापा टाकला. यावेळी काही महिला आणि पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत इथे आढळून आले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेकांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय, काही जण कोरिओग्राफर आहेत तर एक महिला ही परदेशी नागरिक आहे.

पोलिसांनी या सर्व 22 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दारुच्या बाटल्या, हुक्का, कॅमेरा, ट्रायपॉड आणि इतर साहित्य हस्तगत केलं. धक्कादायक म्हणजे या पार्टीत कोकेनसह इतर दोन ड्रग्सचाही वापर केला जात होता. या रेव्ह पार्टीत चित्रपटसृष्टीशी संबंधित महिला तर होत्याच मात्र इथे ड्रग्सही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ड्रग्ज पुरवल्याच्या संशयातून एका नायजेरियन नागरिकाला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ड्रग्सचे मुंबई कनेक्शन या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.

या रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल केलाय. मात्र या पार्टीचे आयोजक कोण होते? अजून कोण कोण या पार्टीशी संबंधित आहेत? नायजेरियन नागरिकाने ड्रग्ज आणले कुठून? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. दरवर्षी इगतपुरीत अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केलं जात असल्याने इगतपुरी हा रेव्ह पार्टीचा अड्डा बनलाय का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.