”जुनी वाहने २० दिवसांत नष्ट करा” IGP डॉ. प्रतापराव दिघावकर यांचे निर्देश

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : वर्षानुवर्षे पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असलेली जुनी वाहने २० दिवसांत नष्ट करण्याचे निर्देश विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी येथील अधिकाऱ्यांना दिले. शनिवारी (ता.२८) पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत डॉ. दिघावकर यांनी विविध विषयांवर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जुनी वाहने २० दिवसांत नष्ट करण्याचे निर्देश

शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताइत बनलेल्या नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी शनिवारी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याला भेट दिली. या वेळी त्यांनी पोलिस निरीक्षक संजय महाजन यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीच्या तक्रार अर्जांची माहिती जाणून घेतली. सुशिक्षित बेरोजगारांची झालेली फसवणूक, पिंपळगाव परिसरातील विविध गुन्हे किती मार्गी लागले, याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून पडलेली जुनी वाहने २० दिवसांत नष्ट करण्याचे निर्देश दिले.

आवारात स्वच्छता करण्याच्या सूचनाही

पोलिस ठाण्याच्या आवारात स्वच्छता करण्याच्या सूचनाही दिघावकर यांनी दिल्या. पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाडचे पोलीस उप अधीक्षक सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक रंगराव सानप, ओझरचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पिंपळगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, सिन्नरचे पोलिस निरीक्षक पाटील, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, सायखेडा पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ, वडनेरभैरवचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव आदी उपस्थित होते.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

शेतकऱ्यांकडून सत्कार

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करून पलायन करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकविण्याचे डॉ. दिघावकरांनी चांगलेच मनावर घेतले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळत आहेत. शनिवारी दिघावकर पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात आले असता कारसूळ, पिंपळगाव बसवंत, मुखेड, बेहेड येथील शेतकऱ्यांनी डॉ. दिघावकर यांचा सत्कार केला. नव्याने द्राक्षबागांचा हंगाम सुरू होतोय. यावर आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही दिघावकर यांनी केले.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली