Jalgaon : भादली गावातील तरूणाचा शेतात आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता

युवकाचा मृतदेह

जळगाव : नशिराबाद जवळील भादली गावातील २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या शेतात बुधवारी (दि. १०) सकाळी आढळून आला. यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचा खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. संदेश लिलाधर आढाळे (वय २८) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. संदेश आढाळे हा तरूण आई वडीलांसह भादली येथे वास्तव्याला आहे. तो जळगावात एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक येथे राहतात. दरम्यान, बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात आढळून आला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील या पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेहाची ओळख पटविली असता, तो संदेश आढाळे याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न आले. त्याच्या पोटावर आणि डोक्यावर घाव असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post Jalgaon : भादली गावातील तरूणाचा शेतात आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता appeared first on पुढारी.