
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
रावेर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात अतिवृष्टी झाल्याने सुकी नदीला मोठा पूर आल्यामुळे काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा रावेर शहराशी संपर्क तुटला आहे. विवरे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पुनगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने मोठी दाणादाण उडाली आहे.
रावेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रावेर शहरातून गेलेल्या नाझजिरी नाल्याला पूर आल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. रावेर तालुक्यातील आभोडा, गारबर्डी धरण १०० टक्के भरले आहे. सुकी नदीला पूर आल्याने रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. विवरे गावात वाघाडी नाल्याला पूर आल्याने गावात काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.
तहसीलदार बंडू कापसे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. दक्षता म्हणून पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी जुना सावदा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. सातपुड्यात झालेल्या पावसाने अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा :
- इर्शाळवाडी दुर्घटना : मदतीसाठी ओघ सुरु, आपत्तीग्रस्तांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा
- पिंपरी : आता स्मार्ट सिटीच्या साहित्यावरही चोरट्यांचा डल्ला
- सावधान ! …तर पुण्यातही होऊ शकते इर्शाळवाडी
The post Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार appeared first on पुढारी.