
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी (दि. 5) मध्यरात्री रावेर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रावेर नदी नाल्यांना पूर आला आहे. यात रावेर शहरातील दोन जण वाहून गेले आहेत. तर मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच रसलपूर मध्ये चार गुरे दगावली आहे.
रावेर तालुक्यात व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने सुकी धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो झाले आहे. रात्री अभोडा येथील तसेच शहरातून गेलेल्या नागझिरी नदीला मोठा पूर आला आहे. रात्री दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपूर येथील नदीला पूर आला आहे. अभोडा येथील नदीच्या पुरात बाबुराव रायसिंग बारेला हा वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर रावेर शहरातील माजी नगरसेवक यांच्यासह एक जण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे दोघे बेपत्ता झाले असून त्यांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते ती दुचाकी आढळली असून, दोघांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. तर रसलपुर मध्ये बलेनो कार वाहून गेली असून, प्रवाशांनी गाडीतून उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत.
रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. यासोबत रमजीपुर रसलपुर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुर मध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहे. खिरोदा व रावेर येथील दहा ते बारा गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा…
तहसीलदार बंडू कापसे आणि त्यांच्या सहकार्यांनी मदत कार्यात सहभाग घेतला आहे. रावेर शहरात माजी नगरसेवक सुरज चौधरी आपल्या टिमसह महसूल प्रशासनास सहकार्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे तर रमजीपुर मध्ये सरपंच प्रकाश तायडे, उपसरपंच योगिता कावडकर, प्रा.उमाकांत महाजन हे ग्रामस्थांना सहकार्य करीत आहेत.
हेही वाचा :
- Dhule Accident : ‘त्या’ भीषण अपघातानंतर सर्वच विभाग ॲक्शन मोडवर
- नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री’ची पीएसआय पदाला गवसणी
- नगर : रस्त्यांच्या कामासाठी 6 कोटी मंजूर : ना. विखे
The post Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण appeared first on पुढारी.