
जळगाव(अमळनेर) : पुढारी वृत्तसेवा
विप्रो कंपनीतून ३३ लाखांचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक निर्धारित ठिकाणी न पोहोचल्यामुळे ट्रक चालकाने तब्बल ३३ लाखांचा संतूर साबण लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अनिलकुमार माइसुख पुनिया (रा.मंगलमुर्ती चौक, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दि. ४ जानेवारी रोजी विप्रो लि. कंपनी, अमळनेर यांच्या कडील १८ टन १०० किलो तयार संतुर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहचविणे असल्याने नेहमी प्रमाणे मामा ट्रान्सपोर्ट कंपनी (अमळनेर) यांना याबाबतचे काम देण्यात आले. माल भरलेला ट्रक हा चालक कैलास श्रीराम गुर्जर (रा. हर्षलो का खेडा पो. भागुनगर, ता. जहाजपुर जि. भिलवाडा राज्य राजस्थान) हा घेवून रवाना झाला होता, सदर वेळी चालकास अनिलकुमार पुनिया यांनी डिझेल व इतर खर्चा करीता ५० हजार रुपयांचे आय.यु.सी.एल. कार्ड दिले होते. त्यानुसार त्याने सदरचे कार्ड स्वीप करुन अमळनेर शहरातील प्रमुख पेट्रोलपंपावर डिझेल भरले होते व उरलेली रक्कम ही त्याने पोहच केल्यावर दिली जाणार होती.
माल कर्नाटक पोहोचलाच नाही
सदरचा माल ट्रक चालक याने दि. ९ जानेवारी रोजी पावेतो तुमकुर (कर्नाटक) येथे पोहेचविणे अपेक्षीत होते. परंतु माल हा ठरल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी न पोहेचल्याने अनिलकुमार पुनिया यांनी चालक कैलास श्रीराम गुर्जर याच्या तसेच ट्रक मालक पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर याच्या मोबाईलवर आणि नमुद ट्रक हा ज्या ट्रान्सपोर्टवरुन अमळनेर येथील ट्रॉन्सपोर्ट वर आला होता, त्या महाविर ट्रॉन्सपोर्टचे (जयपुर राज्य-राजस्थान) मालक मोहन बेरवा यांच्यामोबाईलवर देखील संपर्क केला. परंतू सर्वांचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे तब्बल ३३ लाखांचा साबण लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली.
ट्रक मालक- चालकविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी ट्रक क्र. आर. जे. ११ जि.ए.८१३८ चे चालक- कैलास श्रीराम गुर्जर व ट्रक मालक- पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर (रा.मुरली विहार,देवरीठा, शाहगंज, आग्रा राज्य-उत्तरप्रदेश) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहेत.
हेही वाचा :
- Makar Sankranti 2023 : शनि आणि राहुच्या दोषांपासून मिळेल मुक्ती, मकर संक्रांतीला करा ‘या’ वस्तूंचे दान
- नगर : दादा.. काकाचा मांजाला आश्रय ! मनपा व पोलिसांच्या नाकावर टिच्चून चायना, नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू
- नगर : धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून भीक मागण्यासाठी पाठविले
The post Jalgaon : ३३ लाखांचा संतूर साबण लंपास ; दोघांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.