Jalgaon : शहर भक्कास, नगरसेवक मात्र झक्कास…! जळगाव मनपात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव : राष्ट्रवादी आंदोलन,www.pudhari.news

जळगाव : शहरात रस्ते, गटारी, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी समस्या भेडसावत आहे. नागरी सुविधा देण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपासमोर आंदोलन केले. यावेळी आयुक्तांना भेटण्याची मागणी केली मात्र, आयुक्तांनी भेट नाकारल्याने आंदोलक अधिक आक्रमक होऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराचा विकास भक्कास, तर नगरसेवक आणि अधिकारी झक्कास… अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

गेल्या चार वर्षांपासून जळगाव शहरातील रहिवाश्यांना रस्ते, गटारी, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असून शहरातील सर्वच प्रमुख रस्ते व प्रभागातील, कॉलन्यांमधील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अमृत योजना व भुयारी गटारी खोदकामाने सर्वच भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सर्व रस्त्यांची कामे मंत्री व पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना देऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही कामांना सुरूवात करण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी, महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील, उपाध्यक्ष भगवान सोनवणे, यशवंत पाटील, किरण राजपूत, अशोक सोनवणे, अमोल कोल्हे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपळनेर : विधवा प्रथाबंदी काळाची गरज; अनिसच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा’

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार…
शहरातील रस्त्याची कामे एकाच मक्तेदाराला दिले असून त्याच्याजवळ संपूर्ण यंत्रणा व कामाचा कोणताही अनुभव नसल्याने कमी दरात सब कॉन्ट्रॅक्टरांना कामे देण्यात येत असल्याने सब कॉन्ट्रॅक्टर कामे करण्यास तयार नाही. जे सब कॉन्ट्रॅक्टर कमी दरात कामे करीत आहे ते कामाची गुणवत्ता टिकवू शकत नसल्याने दोन ते तीन महिन्यातच रस्ते खराब होत आहेत. तीच गत गटारीबाबत झाली असून शहरातील नवीन वाढीव भागात रस्ते व गटारी होत नसल्याने सांडपाणी साचले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नियमितपणे रस्ते, गटारींची स्वच्छता होत नसतानाही मक्तेदारांची बिले वेळेवर काढली जातात. गेल्या ६ महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पिण्यायोग्य पाणी शहरवासीयांना मिळत नाही. पिवळसर दुर्गंधीयुक्त, रात्री बेरात्री कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

The post Jalgaon : शहर भक्कास, नगरसेवक मात्र झक्कास...! जळगाव मनपात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.