Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यासाठी सल्लागार नेमणार

कुंभमेळा नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिका सल्लागार संस्थेची नेमणूक करणार आहे. आराखड्याबरोबरच सिंहस्थाच्या कामांसाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा करण्याचे कामदेखील संबंधित सल्लागार संस्थेकडे सोपविण्यात येणार आहे. यासाठी लवकरच महापालिका पात्र संस्थांकडून स्वारस्य देकार मागविणार आहे.

२०२७-२८ मध्ये नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मनपास्तरावर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती गठीत करण्यात आली असून, समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिंहस्थ आराखड्यासाठी साधुग्रामकरिता लागणारी जागा, जागेवरील आरक्षण व त्याचे भूसंपादन याविषयीचा आढवा घेण्यात आला. सिंहस्थासाठी लाखो साधू, संत, महंत आणि भाविक हजेरी लावत असतात. त्यांना विविध प्रकारच्या पायाभूत आणि मूलभूत सेवा सुविधा पुरविल्या जातात. त्यादृष्टीने मनपाकडून करावयाच्या कामांचे नियोजन व आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी हजारो कोटींचा निधीची आवश्यकता भासणार असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून निधीची मागणी केली जाणार आहे. त्यानुसार विविध विकासकामे, प्रकल्प आणि निधी याबाबतचा एक सविस्तर आराखडा तयार करण्याकरता सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. सिंहस्थ कामांसाठी सविस्तर आराखडा तयार करून केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याबरोबरच आराखड्यानुसार सिंहस्थ कामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त करून घेण्यासाठी पत्रव्यवहार करणे आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी सल्लागार संस्थेकडेच सोपविली जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पर्वणी काळात येणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे बाह्य व अंतर्गत वाहनतळ उभारले जाणार आहे. त्याकरिता जागांचे अधिग्रहण करण्यात येणार असून, त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी भूसंपादन विभागाला दिले आहेत.

बाह्यरिंगरोडचे काँक्रिटीकरण
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्यरिंगरोड तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी टीडीआरच्या माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार असून, प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भूसंपादन व नगररचना विभागाला आयुक्तांनी दिले आहेत. डांबरी रस्ते पावसाळ्यात खराब होत असल्याने बाह्यरिंगरोडचे काँक्रिटीकरण करण्यावर मनपाचा भर असेल.

हेही वाचा :

The post Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यासाठी सल्लागार नेमणार appeared first on पुढारी.