Lalit Patil Drug Case : ललितच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील आणि त्याचा भाऊ भूषण यांनी ड्रग्जविक्री करून आलेल्या पैशांतून सोन्या-चांदीच्या विटा खरेदी केल्याचे उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने-चांदी कोणत्या सराफ व्यावसायिकांकडून खरेदी केले, खरेदीचे व्यवहार कागदोपत्री आहेत की नाही याची, नसेल तर सोने-चांदी कोठून मिळवले, याची चौकशी पोलिस करीत आहेत.

ड्रग्जच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी भूषण पानपाटील-पाटील व अभिषेक बलकवडे उर्फ जर्मन याला पकडले. सखोल तपासात दोघांकडून तीन किलो वजनाच्या सोन्याच्या विटा जप्त केल्या, तर नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या विभागाने ललितला आर्थिक मदत करणाऱ्या अर्चना किरण निकमकडून पाच लाख रुपयांची सात किलो चांदी जप्त केली आहे. त्यामुळे ललित आणि भूषण यांनी ड्रग्जविक्रीतून आलेल्या पैशांमधून सोने-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही भावांसह इतर मुख्य संशयितांनी ड्रग्जविक्रीतील पैशांचा वापर कसा केला, याचा शोध सुरू केला आहे. संशयितांनी सोने-चांदी कोणत्या सराफ व्यावसायिकांकडून घेतले? त्यांनी खरेदी व्यवहार कशा प्रकारे केला? स्थावर मालमत्ता किंवा इतर कोणत्या प्रकारची संपत्ती संशयितांनी घेतली, याचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे संशयितांच्या आर्थिक व्यवहारांवर पाेलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा :

The post Lalit Patil Drug Case : ललितच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित appeared first on पुढारी.