बिबट्या

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

म्हेळुस्के येथे बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा तालुक्यातील खेडले येथील शेतकरी अरुण हरिराम मेधने यांच्या शेतात गोट फार्मवर जाऊन सायंकाळी ७.३० च्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला कर असून, तिला जखमी केले आहे.

खेडले येथील शेतकरी अरुण हरिराम मेधने हे आपल्या शेतात कुटुंबीयासह वास्तव्यासाठी राहतात व शेतीला जोडधंदा म्हणून गोट फार्म चालवतात. त्याचबरोबर शेळ्या, गायी, वासरे, बैलदेखील सांभाळतात; परंतु गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने गोट फार्म घुसून शेळीवर हल्ला केला. त्याचवेळी शेळ्या व गाय, बैल यांनी मोठ्याने आवाज केल्यामुळे मेधने घराबाहेर आले. त्याच क्षणी बिबट्याने तेथून धूम ठाकली. शेळीवर औषधोपचार केला असला तरी शेळी गंभीर जखमी असल्यामुळे ती जिवंत राहील याची शाश्वती देता येणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सदर घटनेमुळे खेडले परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने येथे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

त्वरित पिंजरा लावण्याची मागणी

दिंडोरी तालुक्यात बिबट्यामुळे पशुधन धोक्यात आले असून, बिबट्याकडून पाळीव प्राणी व पशुधनावर हल्ले होत असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेडले येथील घटनेनंतर वनविभागाने तेथे त्वरित पिंजरा लावण्याची मागणी सरपंच उषा वाघ, सदस्य नामदेव वाळके, रामराव मेधने, गंगाधर पवार, पांडुरंग गाडगे, बामजीराव वाळके, संभाजी मेधने, प्रदीप मेधने यांनी केली.

हेही वाचा :

The post Leopard attack : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सलग दोन दिवस बिबट्याचे हल्ले appeared first on पुढारी.