Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक

SBI

जळगाव : भुसावळ शहरातील स्टेट बँकेच्या शाखेची कोट्यवधी रुपयांत फसवणूक (Loan scam) केल्याप्रकरणी दोन बँक मॅनेजर, व्हॅल्यूअरसह २६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्र तयार करून बँकेत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २ कोटी ७९ लाख ३०० रुपयांचे गृहकर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

भुसावळ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत हा घोटाळा (Loan scam) उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून २२ मार्च २०१८ ते १६ जून २०१९ या काळात बँकेतून १ कोटी ४० लाख १ हजार रुपयाचे गृह कर्ज घेण्यात आले. घेतलेले गृह कर्ज घरासाठी उपयोगात न आणता अन्य ठिकाणीच त्याचा उपयोग केला. याबाबत बँक मॅनेजर मनोज बेलेकर (रा. भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. यावरून बँकेचे तत्कालीन मॅनेजर विशाल इंगळे, व्हॅल्यूवर एसएम शिंदे यांच्याशी संगनमत करुन कर्ज घेतले होते. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलीस ठाण्यात महेश देविदास तायडे, प्रतिभा गोपाळ सोनवणे, हबीब शाह गंभीरशाह, जितेंद्र गंगाधर पाटील, सुलताना बी अहमद कुरेशी, फरजान बी महेमुद खान पठाण, गणेश किसन तेली, वैशाली किसन तेली, शोएब रजा शेख साजिद, हसीना बी अब्बास शहा, नदीम खान सुलतान खान, बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक विशाल इंगळे, व्हॅल्यूवर एस. एम. शिंदे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तू चाल पुढं : नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररूपी रावणाचे दहन करू शकेल का अश्विनी?

दुसर्‍या गुन्ह्यात १ कोटी ३७ लाखांची फसवणूक
याच शाखेमधून दुसर्‍या एका प्रकरणांमध्ये गृह कर्जाच्या नावाखाली बँकेचे मॅनेजर नंदलाल पाटील, व्हँल्युअर अशोक एम. दहाड, एस. एम. शिंदे, समीर बेले यांच्यासह गफार अली मोहम्मद अली, तोफिक खान मुसाखान, तोफिक खान मेहमूद खान, रईसाबी गंभीर शाह, निलोफर बी तोफिक खान, कौसर खान यासीन खान, यास्मिन बी अजीज खान, तनवीर फत्तु तडवी, पुनम भीमराव जाधव यांच्यासह १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा :

The post Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक appeared first on पुढारी.