नाशिक : महाविकास आघाडी सरकारकडून आज विधिमंळात राज्याचा अर्थसंकल्प आज (ता.८) अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात नाशिकसाठी काही महत्वपुर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.
सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे-नाशिक या दोन शहरांदरम्यानच्या प्रस्तावित असलेल्या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून १६ १३९ कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान निधीची कमतरता पडू न देता हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे.
समृद्धी महामार्ग आणि नाशिक - मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार असल्याची घोषणा देखील आज करण्यात आली. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी विशेष निधीची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. राज्यात 7 जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा अजित पवार यांनी केली. यामध्ये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत.