Mahashivratri 2021 : त्र्यंबकेश्‍वरला भक्तांना दर्शनासाठी  बंदी, मात्र पालखी सोहळ्यात गर्दी 

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक)  : येथे महाशिवरात्रीला दरवर्षीप्रमाणे फक्त धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांना व स्थानिक नागरिकांना मंदिरात प्रवेशास मनाई व जमावबंदी लागू असल्याने भाविक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या बंद दरवाजाचे दर्शन घेऊन पायरीवर फुले वाहत होते. या वेळी महाशिवरात्रीला भक्तांना दर्शनासाठी बंदी, तर पालखी सोहळ्यात गर्दी बघायला मिळाली. 

पायरी अथवा कळसाचे दर्शन घेऊन समाधान

या वर्षी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई जरा वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. मंदिर जीर्णोद्धारास २३५ वर्षे झाली आहेत. या काळात मोठ्या साथीशिवाय मंदिर बंद नसल्याचे जुने जाणकार सांगतात. तर कायम भाविकांसाठी खुले असलेल्या या महादेवाचे मंदिर कोरोना महामारीमुळे कवाडे बंद झाल्याने भक्तांच्या नाराजीचा सुरू होता. अनेकांनी पायरी अथवा कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले. 

देवस्थानच्या त्रिकाल पुजेव्यतिरिक्त मध्यरात्री विशेष महापूजा संपन्न झाली. या वेळी अभिषेक, पूजा व सप्त धान्यांची आरास करण्यात येते. दुपारी साडेतीनला परंपरेनुसार ‘श्रीं’चा पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेऊन सवाद्य पालखी काढण्यात आली. या पालखीसमवेत विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, भूषण अडसरे, ॲड. पंकज भुतडा, तृप्ती धारणे, संतोष कदम व देवस्थानचे अधिकारी उपस्थित होते. पालखीसमवेत पन्नास व्यक्तींना परवानगी असताना अचानक गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक रणदिवे व मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

व्यावसायिकांना फटका 

प्रतिवर्षी महाशिवरात्रीला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. त्या मुळे व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळते. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. कोरोनामुळे या सगळ्यांवर पाणी फेरले गेले. तसेच मंदिरात दर्शनासाठी वशिला लावण्यासाठी कोणालाही गरज पडली नाही. सर्वांना प्रवेश बंद, हे या मागचे कारण होय.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO