Mahashivratri 2021 : 235 वर्षात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला “त्र्यंबकराजा”चे दर्शन बंदच! भाविकांचा मात्र हिरमोड

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग असलेले तसेच नाशिकमधील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर यंदा बंद ठेवण्यात आले आहे. आज महाशिवरात्री असून भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. आज देशासह राज्यभरात महाशिवरात्री निमित्त शिवमंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पण यंदाही या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. 235 वर्षाच प्रथमच महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर बंद असल्याने भाविकांचा मात्र हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे.

....तर दर्शनासाठी झाली असती भाविकांची मोठी गर्दी 
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शुभम गुप्ता यांनी घेतलेल्या बैठकीत शिवभक्तांसाठी महाशिवरात्र उत्सवास मंदिर खुले राहील, असा दिलासा देण्यात आला होता. मात्र, त्याचदिवशी रात्री उशिरा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची बैठक होऊन यादिवशी त्र्यंबकराजाचे दर्शन बंदच ठेवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी दरवर्षी त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी मंदिराचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

सर्वत्र शिवमंदिर बंद असताना केवळ त्र्यंबकेश्वर येथेच मंदिर खुले ठेवले तर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळेल आणि तिला नियंत्रित करता येणार नाही. यासाठीच मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पालखी उत्सव शासन निर्देशानुसार मार्यादित उपस्थितीत पार पडणार आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून सर्व नित्यपूजा नियमित होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

महाशिवरात्री निमित्त मंदिरावर खास लेझर शो
नाशकातील लेझर शोने त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर उजळून निघालं आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिरावर खास लेझर शो करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास मंदिरावर लेझर शोचा झगमगाट करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाकडून यंदा भाविकांना मात्र मंदिरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा महाशिवरात्री सोहळा पार पडणार आहे.मंदिराच्या आतील गर्भगृहात सजावट आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला, मंदिराच्या आतील गर्भगृहात सजावट आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला