Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी

त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर संपूर्ण वर्षात केवळ महाशिवरात्रीलाच रात्रभर भक्तांसाठी खुले असते. यंदा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर शनिवारी (दि. १८) सकाळी ४ पासून रविवारी (दि.१९) रात्री ९ पर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील. भक्तांना मध्यरात्रीही भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेता येणार आहे.

मंदिराला रोषणाई केली आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येत आहे. भाविकांना पूर्व दरवाजास नुकत्याच बांधलेल्या दोन विंग भव्य दर्शन मंडपातून रांगेने दर्शनासाठी जाता येईल. तातडीने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी उत्तर दरवाजाने देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरू राहणार आहे. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रांगणात सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविलेला आहे. भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. बाहेर जाण्यासाठी दक्षिण दरवाजाचा वापर होणार आहे.

स्थानिक भाविकांना उत्तर दरवाजाने शनिवारी पहाटे ४ ते सकाळी १० व सायंकाळी ६ ते दुसरा दिवस रविवार सकाळी १० पर्यंत प्रवेश मिळणार आहे. महाशिवरात्रीनिमीत्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप होईल.

मंदिर प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम

देवस्थान ट्रस्टने ३ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून, त्यात शुक्रवारी (दि. १७) संध्याकाळी ६ ते रात्री ७.३० पर्यंत पं. नीलाद्री कुमार यांचा सितारवादनाचा व रात्री ७.३० ते ९ पर्यंत ओम नटराज अकॅडमीतर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होईल. नृत्य दिग्दर्शन मयूरी बेडकर यांचे आहे. शनिवारी (दि. १८) दुपारी २ ला रा. स्व. संघ. त्र्यंबकेश्वरकडून घोष वादन, सायंकाळी ५.३० ला बासरी प्रशिक्षण वर्ग नाशिककडून बासरी वादन कार्यक्रम व सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत कीर्तनकार चंद्रशेखर शुक्ल यांचा शिवस्तुस्ती हा कार्यक्रम होईल. रविवारी (दि.१९) सायंकाळी ७ ते ९ यावेळेत पद्मविभूषण पं. जसराज यांचे पटशिष्य पं. प्रसाद दुसाने यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. सर्व कार्यक्रम श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात होणार आहेत.

पालखी सोहळा

परंपरेनुसार शनिवारी (दि. १८) दुपारी ३ ला श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पाचआळीमार्गे पूर्व संस्थानिक जोगळेकर यांच्या वाड्यावरून पारंपरिक मार्गानुसार तीर्थराज कुशावर्त येथे येईल. तेथे षोडशोपचार पूजा करून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पुन्हा देवस्थानामध्ये परत येईल.

हेही वाचा : 

The post Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी appeared first on पुढारी.