Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली

महाशिवरात्र नाशिक,www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

महाशिवरात्री उत्सव (Mahashivratri 2023) हा जणू भक्तांसाठी पर्वणीच असतो. शनिवारी (दि. १८) महाशिवरात्री असल्याने सर्वच शिवमंदिरांमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मंदिर आणि परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंडप व सजावट करण्यात येत आहे.

या दिवशी भाविक शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची मनोभावे पूजा करून शिवपिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्राभिषेक करतात. गोदावरी नदी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिरात या उत्सवानिमित्त दरवर्षी भाविक मोठी गर्दी करीत असतात. सध्या या मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू आहे. तरी या कामाचा अडथळा या महाशिवरात्री उत्सवात भाविकांना होणार नाही, याची खबरदारी विश्वस्त मंडळाने घेतली आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर मंदिर परिसर मोकळा करण्यात येणार आहे. या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहे. कपालेश्वर मंदिरातील महाशिवरात्री पूजेसाठी शरद दीक्षित, कुंदन दीक्षित, निनाद पंचाक्षरी, जगन्नाथ पंचाक्षरी, सतीश शुक्ल, सौरभ गायधनी, प्रतीक शुक्ल यांच्यासह ब्रह्मवृंद कार्यरत आहे.

पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेले गोदाघाटावरील निलकंठेश्वर महादेव मंदिरही सज्ज झाले आहे. या मंदिरावर वाढलेले गवत व वृक्षांची रोपे काढून मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर पाण्याच्या साहाय्याने स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मंदिराचे सौंदर्य अधिकच उजळले आहे.

गोदापात्रातील सिद्ध पाताळेश्वर महादेव, त्यागेश्वर, कर्पूरेश्वर, काशी विश्वेश्वर, बाणेश्वर, नारोशंकर, तारकेश्वर आदी मंदिरांची स्वच्छता करून आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहे. संत जनार्दन स्वामी आश्रमातील शर्वायेश्वर महादेव मंदिरातही महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू आहे. याबरोबरच नांदूर घाटावरील नीलकंठेश्वर, रुद्र फार्मजवळील महामृत्युंजय, मानूर येथील शिवगंगा, जुना आडगाव नाका येथील महादेव मंदिर, क्षीरसागर कॉलनी, हिरावाडी रोड येथील बेलेश्वर, औरंगाबाद नाका येथील मनकामेश्वर, मानेनगर येथील ओमकारेश्वर यांसह आडगाव, म्हसरूळ, हनुमानवाडी, मखमलाबाद परिसरातील महादेव मंदिरांतही जय्यत तयारी सुरू आहे.

भाविकांसाठी श्री कपालेश्वर मंदिर २४ तास खुले

महाशिवरात्रीला यंदा प्रदोष आल्याने दुर्मीळ योग जुळून आला आहे. कपालेश्वर मंदिरात पहाटे ब्रह्मवृंदांच्या हस्ते पूजा व अभिषेक होईल. सायंकाळी ४ ला पालखीची मिरवणूक काढली जाईल. दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात येईल. रात्री आरती होईल व पुन्हा रात्री ११ ला प्रहर पूजेस सुरूवात होईल. ही पूजा पहाटेपर्यंत चालेल. यात विविध प्रकारचे स्नान, अभिषेक व शृंगार केले जातील. त्यामुळे मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच मंदिरात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गांची व्यवस्था असेल. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून प्रवेश, तर मागील बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग असेल.

हेही वाचा : 

The post Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली appeared first on पुढारी.