Makar Sankranti Festival : गई बोले रे धीना…पतंगोत्सवात रंगले नाशिककर; विविध पतंगांमुळे आकाश बहुरंगी 

पंचवटी (जि. नाशिक) : चिमुरड्यांसह तरुणाईच्या अमाप उत्साहात आकाशात उंच-उंच उडणाऱ्या विविध आकारातील पतंग. ‘दे ढील’ बरोबरच ‘गई बोले दे धीना’चा गजर आज (ता.१४) शहराच्या गल्लीबोळांसह विविध उपनगरांत दिवसभर सुरू होता.

संक्रातीचे औचित्य साधत सकाळपासून विविध आकारातील व रंगातील पतंगांमुळे आकाश जणू बहुरंगी बनले होते. सायंकाळी एकमेकांना तिळगूळ वाटप करत कटू आठवणी विसरून गोड बोलण्याचा गोडगोड सल्लाही देण्यात आला. सोशल मिडियावर सकाळपासून संक्रांतीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होती. 

घरांच्या गच्च्यांवर पतंगप्रेमींची गर्दी

यंदाच्या मकर संक्रांतीवर प्रथम कोव्हिडचे व नंतर नॉयलॉन मांजाचे सावट होते. नॉयलॉन मांजामुळे निरपराध पक्ष्यांसह मानवालाही हानी पोहोचत असल्याने अनेक ठिकाणी नॉयलॉन मांजा वापरणार नाही, वापरू देणार नाही, अशा शपथाही घेण्यात आल्या. पतंग उडविण्याचा आनंद घेण्यासाठी शहरासह उपनगरांतील घरांच्या गच्च्यांवर पतंगप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी प्रथमच विविध प्राणी व पक्षांच्या आकारातील पतंग विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. बच्चेकंपनीकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी अनेक ठिकाणी संगीताच्या ठेक्यावर पतंग उडविण्याचा आनंद घेण्यात आला. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

हळदीकुंकू समारंभही रंगला

सायंकाळी तीळगुळ घ्या, गोड, गोड बोला असे म्हणत एकमेकांना तीळगुळ देत शहरात मकरसंक्रांत साजरी झाली. यानिमित्ताने महिलांनी एकमेकींना सुगडीचे वाण देत संक्रांत साजरी केली. यादिवशी स्नानाबरोबरच दान, जप, तपाला मोठे महत्व असल्याने गोदाघाटावर वाण दान देण्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी उसळली होती. तूप, तीळ, खिचडीचे मोठ्या प्रमाणावर दान करण्यात आले. पाटावर मातीच्या बोळक्यांमध्ये नवीन धान्य ऊस ,बोरे, हरभरे, गव्हाच्या ओंब्या, गाजर, तीळ भरून हळदीकुंकू वाहून परंपरेनुसार पूजा करण्यात आली. त्यानंतर महिलांनी एकमेकींना वाणाबरोबरच हळदीकुंकू समारंभही रंगला. 

सकारत्मक सुरवात... 

नवीन वर्षाला कोरोना लसीकरणाच्या निर्णयानंतर सकारात्मक सुरवात झाली असल्याने संक्रांत सणाला आनंदाची पतंग उंच गेलेली पाहावयास मिळाली. सणाचा गोडवा वाढविणाऱ्या तिळगूळ, हलव्याचे दागिने, पूजा साहित्यांची महिलांनी खरेदी केली. गृहिणींकडून तिळगुळाबरोबरच चुरमुऱ्याचे लाडू बनविण्यास प्राधान्य देण्यात आले. अनेकांनी तयार लाडू, रेवड्या, साखर फुटाणे, तिळाच्या वड्या खरेदी करीत सणाचा आनंद लुटला. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा