Makar Sankranti Festival : तरुणांनो! पतंग उडवा पण तुमच्यावर असेल करडी नजर 

नाशिक : मकरसंक्रांती निमित्त दरवर्षी तरुणांकडून इमारतीच्‍या गच्चीवर सकाळपासून ठाण मांडत उंच आकाशात पतंग झेपावतांनाचे चित्र अनुभवायला मिळते. यावर्षीदेखील तरूणाईत पतंगबाजीबाबत उत्‍साह बघायला मिळतो आहे. पण तरुणांनो तरा सांभाळून...कारण तुमच्यावर असेल करडी नजर...

मकर संक्रांती उत्‍सवाची आज अनुभूती 

आप्तस्‍वकीय, मित्र-परिवार आणि नातेवाइकांना तीळ-गूळ देताना नाते आणखी दृढ करण्याचे औचित्‍य मकरसंक्रांतीनिमित्त साधले जाते. यानिमित्त अनेक गृहिणींकडून लाडू बनविण्याची लगबग गेल्‍या काही दिवसांपासून सुरु होती. तर अनेकांनी बाजारात उपलब्‍ध असलेले तयार लाडू खरेदीला पसंती दर्शविली. गेल्‍या काही महिन्‍यांपासून कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सण-उत्‍सव साजरे करण्यावर प्रचंड मर्यादा येत होता. परंतु आता परिस्‍थिती काहीशी नियंत्रणात आल्‍याने, त्‍यात कोरोनाच्‍या लसीकरणाचे वितरणदेखील सुरू झाल्‍याने सुटकेचा श्‍वास सोडत सण साजरा करण्यास पसंती दिली जाते आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

पतंगबाजीसाठी तरूणाईत उत्‍साह, नायलॉन वापरावर करडी नजर 
दरवर्षी तरुणांकडून इमारतीच्‍या गच्चीवर सकाळपासून ठाण मांडत उंच आकाशात पतंग झेपावतांनाचे चित्र अनुभवायला मिळते. यावर्षीदेखील तरूणाईत पतंगबाजीबाबत उत्‍साह बघायला मिळतो आहे. असे असले तरी पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर पोलिस व प्रशासनामार्फत करडी नजर ठेवली जात असून फौजदारी स्‍वरूपाची कारवाईदेखील केली जाणार आहे. त्यामुळे पतंगबाजीचा आनंद घेताना, नियमांचे पालन करण्याचे आवाहनदेखील केले जाते आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

सोशल मीडियावरही उत्‍साह 
मकरसंक्रांतीनिमित्त सोशल मीडियावरही उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. ज्‍यांची भेट घेणे शक्‍य नाही, अशा परिचितांना सोशल मीडियाच्‍या माध्यमातून शुभेच्‍छा देत ऋणानुबंध जपण्यावर भर देताना अनेक जण दिसले. त्‍यासाठी शुभेच्‍छा संदेश, शुभेच्‍छापत्रासह अन्‍य पर्यायांचा वापर केला. राजकीय क्षेत्रातूनही मतदारांशी यानिमित्त संपर्क साधण्याची संधी साधण्यात आली. 
 

बाजारपेठेत लगबग

नवीन वर्षाला उत्‍साहात सुरवात झाल्‍यानंतर, वर्षातील पहिला सण असलेल्‍या मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सणाचा गोडवा वाढविणाऱ्या हलवा, तिळाचे लाडू व अन्‍य साहित्‍य खरेदीसाठी बुधवारी (ता.१३) बाजारपेठेत लगबग बघायला मिळाली. पतंगबाजीसाठी तरूणाईत प्रचंड उत्‍साह असला, तरी नायलॉनच्‍या वापरावर पोलिसांची करडी नजर ठेवली जाते आहे.