Malegaon : मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल

एकनाथ शिंदे विभागीय बैठक मालेगाव

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे नियोजित मालेगावच्या दौऱ्यावर आले असून पोलिस वसाहत लोकार्पण, काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन करुन ते विभागीय आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल झाले आहेत.

सकाळी ९ वाजता ही बैठक सुरू होणार होती. परंतु, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने सभा आणि बैठक स्थळावरील काम प्रभावित झाले. पाणी काढून साफसफाई, बैठक व्यवस्था लावण्यात अधिक वेळ गेला.
त्यामुळे कार्यक्रमाची रूपरेषा बदलण्यात आली. दुपारचे भूमिपूजन, लोकार्पणाचे कार्यक्रम सकाळ सत्रात उरकण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्र्यांचा ताफा क्रीडा संकुलात दाखल झाला. यावेळी माजी मंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार खासदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

कांद्याची भेट नाकारली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर पाच किलो कांदे भेट आणि निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी रोखले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आपले वाहन थांबवून केवळ निवेदन स्वीकारले. कांदा दर घसरले असल्याने ८०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे तसेच अधिकाधिक कांदा निर्यात करावी, अशी मागणी करण्यात आली.

The post Malegaon : मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल appeared first on पुढारी.