Manikrao Gavit : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

माणिकराव गावित यांचे निधन,www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

सलग 9 वेळा खासदार पदी निवडून येत देशातील टॉप टेन खासदारांमधे गणले गेलेले आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेते असूनही अत्यंत साधी राहणी साठी प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव होडल्या गावीत यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी आज दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होता. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता नवापूर येथील सुमाणिक चौक येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. नाशिक येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता नवापूर येथील सुमाणिक चौक येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

१९९८ मध्ये नंदुरबार जिल्हा निर्मिती झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रथम महिला अध्यक्षा म्हणून त्यांच्या ज्येष्ठ कन्या स्वर्गीय हेमलता वळवी यांना मान मिळाला होता. त्यांच्या दुसर्‍या कन्या निर्मला गावित या ईगतपूरी विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पूत्र भरत गावित हेदेखील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भुषविले आहे. कै. गावित यांच्या स्नुषा संगीता गावित यादेखील सलग दुसर्‍यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत.

माणिकराव यांची राजकीय वाटचाल:

कै. माणिकराव गावीत यांची राजकीय कारकिर्द सन १९६५ पासून सुरु झाली. सन १९६५ ते ७१ या कालावधीत ते तत्कालीन नवापूर ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले होते. सन १९७१ मध्ये ते तत्कालीन धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांनी १९७१ ते ७८ या काळात तत्कालीन धुळे जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. १९७८ ते ८४ या काळात धुळे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते.

१९८०-८१ मध्येे नवापूर विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९८१ मध्ये सातव्या लोकसभेत ते नंदुरबार लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९८४ मध्ये दुसर्‍यांदा, १९८९ मध्ये तिसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून आले.

१९९०-९१ मध्ये सभागृहातील बैठकांना अनुपस्थित सदस्यांच्या कमिटीत त्यांची निवड करण्यात आली. १९९१ मध्ये १० व्या लोकसभेत ते चौथ्यांदा निवडून आले होते. १९९०-९६ मध्ये पेट्रोलियम आणि रसायन मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर त्यांची निवड करण्यात आली.

१९९१ ते ९३ दरम्यान दोन वेळा त्यांची रेल्वे सल्लागार समितीवर निवड करण्यात आली. १९९६ मध्ये ११ व्या लोकसभेत ते पाचव्यांदा निवडून आले. १९९८ मध्ये १२ व्या लोकसभेत सहाव्यांदा निवडून आले. १९९८-९९ मध्ये कामगार कल्याण समितीवर त्यांची निवड करण्यात आली.

१९९९ मध्ये १३ व्या लोकसभेत ते सलग सातव्यांदा निवडून आले. सन १९९९-२००१ या काळात त्यांची अनुसूचित जाती, जमाती कल्याण समितीवर निवड करण्यात आली. सन २००० ते २००४ या काळात पुन्हा पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या सल्लागार समितीत त्यांची निवड करण्यात आली.

२००४ मध्ये १४ व्या लोकसभेत ते सलग आठव्यांदा निवडून आले. दि.२३ मे २००४ रोजी त्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. ६ एप्रिल २००८ पर्यंत ते डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

सन २००९ मध्ये १५ व्या लोकसभेत ते सलग नवव्यांदा नंदुरबार लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यांच्या कार्याची दखल घेवून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांची १ जून २००९ रोजी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड केली होती. नवीन लोकसभा अध्यक्षाची निवड होईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.

३१ ऑगस्ट २००९ रोजी त्यांची ग्रामीण विकास समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. ७ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांची नितीशास्त्र समितीवरदेखील निवड करण्यात आली. २२ जुलै २०१३ रोजी त्यांची पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.

अशाप्रकारे सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदार संघात निवडून कै. माणिकराव गावीत यांनी विक्रम केला होता. मात्र, १६ व्या लोकसभेत त्यांचा खा.हिना गावित यांनी १ लाखांवर मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून मात्र, ते राजकारणापासून अलिप्त होते.

अत्यंत मृदू स्वभाव साधी राहणे आणि प्रत्येक सामान्य कार्यकर्ता व सामान्य नागरिक यांना सहज उपलब्ध होऊन सहज संवाद करणे ही माणिकराव गावित यांची खासियत होती केंद्रीय राज्यमंत्री असताना सुद्धा कोणत्याही पान टपरीवर थांबून स्वतः विड्याचे पान खरेदी करणे आणि यासारखे सर्व कामे स्वतः करणे त्यांनी कधी सोडले नाही पदाचा आणि अधिकारांचा बडेजाव कधी केला नाही म्हणूनच कायम सर्वांना ते आपल्या हक्काचे वाटत राहिले

The post Manikrao Gavit : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन appeared first on पुढारी.