Marathi Sahitya Sammelan : ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या तयार आराखड्याबाबत वाच्यताच नाही? नाशिककरांना पडले कोडे

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्ताने साहित्यातील ‘नाट्य’चा पडदा उघडल्यापासून एकामागून एक रंजक किस्से पुढे येऊ लागलेत. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ माजी खासदार समीर भुजबळांनी संमेलनस्थळाची पाहणी केलीय. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकी झाल्या. नाशिक फेस्टिव्हल आयोजनाच्या अनुभवाचा फायदा संमेलनाच्या तयारीसाठी मिळू शकतो, असे बैठकींमधून अधोरेखित झाले. पण ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या तयार असलेल्या आराखड्याबाबत वाच्यता का झाली नाही, असे कोडे नाशिककरांना पडले आहे. याच पार्श्‍वभूमीवर अनुभवाचा फायदा घेण्यासाठी यजमान कितपत तयार आहेत, हा खरा प्रश्‍न आहे. 

इव्हेंट मॅनेजमेंट’च्या तयार आराखड्याबाबत वाच्यताच नाही
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळपाहणी समिती आलेली असताना आणि नंतर महामंडळाच्या दोनदिवसीय नाशिकमधील बैठकीनिमित्त ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा आराखडा सादर झाला. हे जरी एकीकडे असले, तरीही दुसरीकडे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्षपदी खगोलशास्त्र डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांतर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत आराखडा वास्तुविशारद महाविद्यालयाला तयार करायला सांगितला आहे, अशी माहिती देण्यात आली. १ ते ७ फेब्रुवारीला वास्तुविशारद महाविद्यालयातर्फे ४८ एकर परिसरातील पाहणी करून रेखांकन केले जाईल, असे स्पष्ट करत असतानाच महाविद्यालयातर्फे बक्षीस देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या जोरावर नियोजन पूर्णत्वाच्या दिशेने निघाल्याचे नाशिककरांना उमगले आहे. म्हणूनच नाशिक फेस्टिव्हलच्या अनुभवाचा फायदा घेतला जाईल, अशी चिन्हे बैठकींसाठी उपस्थित असलेल्यांना दिसत नाहीत. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

जिल्ह्याच्या इतिहासविषयक उपक्रमाची गंमत न्यारी 
संमेलन नाशिकशी जोडण्यासाठी काही उपक्रम घेण्यात आल्याची माहिती श्री. ठाले-पाटील यांनी दिली. त्यात विशेषतः नाशिक जिल्ह्याला १५१ वर्षे होत असल्याच्या अनुषंगाने वर्षभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सुरवात संमेलनापासून होईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. त्यापुढे जाऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली उपक्रम राबविला जाणार असल्याचे यजमानांनी जाहीर केले. पण हाच उपक्रम ‘गॅस’वर होता. त्यासंबंधाने मिळालेली माहिती गमतीशीर आहे. मुळातच, हा विषय महामंडळाच्या बैठकीच्या विषयपत्रिकेत होता काय, हा संशोधनाचा विषय आहे. उपक्रम कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यासंबंधीचा लघुसंदेश जिल्हा प्रशासनाकडून येऊन धडकल्याने त्यावर श्री. ठाले-पाटील यांच्याशी चर्चा करावी लागली. त्यांची अनुकूलता मिळताच, उपक्रम संमेलनाच्या विषयपत्रिकेपर्यंत पोचल्याची माहिती पुढे आली आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

संवंगासंबंधी किस्सा 
जो भेटेल आणि जसे सुचेल, तशी माहिती देण्याच्या ‘कार्यक्रम’मधून संवंगासंबंधीचा किस्सा ऐकावयास मिळाला. महामंडळाची स्थळपाहणी समिती नाशिकमध्ये येणार म्हटल्यावर शहरातील काही जागांची माहिती भेटणाऱ्यांना देण्यात आली. हे समजल्यावर शहरातील विद्यापीठातून आमची जागा कधी पाहिली जाणार, याची विचारणा सुरू झाली. त्या वेळी स्थळपाहणी समिती विद्यापीठात येणार नाही म्हटल्यावर विद्यापीठाच्या प्रशासनातर्फे सुटकेचा निःश्‍वास सोडण्यात आला. मग अशा वेळी काय करायचे म्हटल्यावर पटकन संबंधितांना एका समितीचा प्रस्ताव दिला गेला. हे कमी काय म्हणून ग्रंथदिंडीची जबाबदारी किती जणांकडे आहे, याचे कोडे अद्याप नाशिककरांना उलगडलेले नाही. कुसुमाग्रज स्मारक, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या माध्यमातून तयारीला सुरवात झाली असताना एकाने देणगी दिल्यावर त्यांच्याकडेही तोंडी ग्रंथदिंडीची जबाबदारी दिली गेल्याची माहिती नाशिककरांपासून दडून राहिलेली नाही. हा किस्सा खास नाशिकच्या शैलीत चर्चिला जात आहे. ‘त्यात काय विशेष, एकाकडे ग्रंथांची आणि दुसऱ्याकडे दिंडीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते,’ अशी मिश्‍कील टिप्पणी चर्चेच्या अग्रस्थानी असते. मग चर्चेत सहभागी असणारे पोटभरून हसायला लागतात.