Marathi Sahitya Sammelan : कोल्‍हापूरच्‍या खासबारदारांच्‍या बोधचिन्‍हाची निवड; संमेलनाच्‍या घोषवाक्‍याचेही अनावरण 

नाशिक : प्रत्येक संमेलनाची प्रथमदर्शनी ओळख होते ती त्यासाठी करण्यात आलेल्या घोषवाक्‍य अन्‌ बोधचिन्हाद्वारे. नाशिकमध्ये होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही बोधचिन्ह आणि घोषवाक्‍य आकर्षक आणि समर्पक असावे, ही आयोजकांप्रमाणेच नाशिककरांची इच्छा होती. त्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. ५३ जणांनी बोधचिन्ह आणि घोषवाक्य बनवून पाठवले.

पाठवण्यात आलेल्या सर्व बोधचिन्हापैकी कोल्हापूरचे अनंत गोपाळ खासबारदार यांनी पाठवलेल्या बोधचिन्हाची निवड झाली आहे. शनिवारी या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे प्रकाशन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक जयंतराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. निवड समितीत वास्तूविशारद संजय पाटील, चित्रकार राजेश सावंत, कल्पक योजनाकर आनंद ढाकीफळे, लेखक दत्ता पाटील व प्राजक्त देशमुख यांनी काम केले. 

‘सकाळ’च्‍या पाठपुराव्‍याला यश 

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाची पोलखोल करण्यासाठी ‘सकाळ’मध्ये ‘साहित्‍यातील नाट्य’ या सदराखाली प्रकाशित होत असलेल्या वृत्त मालिकेच्‍या पहिल्‍याच भागात बोधचिन्‍हाला मुहूर्त लागत नसल्‍याचे निदर्शनास आणताना, नियोजनातील गोंधळ मांडला होता. या पाठपुराव्‍याला अखेर यश आले असून, शनिवारी (ता. ३०) संमेलनाचे बोधचिन्‍ह व घोषवाक्‍याचे अनावरण झाले. कोल्‍हापूरचे अनंत खासबारदार यांच्‍या बोधचिन्‍हाची निवड झाली आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

बोधचिन्हाचे विश्‍लेषण 

प्रतिभेच्या अवकाशातून निर्माण होणारे साहित्य हे अनंताकडून अनंताकडे प्रवाहित होणारे असते. त्याच्या निदर्शक डावीकडच्या प्रारंभाच्या रेषा आहेत, ज्या वेगवेगळ्या स्तरावरून येत ग्रंथाकडे प्रवासत जातात. मध्यभागी लेखनाचा ग्रंथरूपातला महत्वाचा टप्पा असून, तो उलगडलेला दिसतोय आणि त्याच अवकाशातून झरणारी लेखणी साहित्यातील समतोलाचे प्रतिक आहे. 
बोधचिन्हाच्या उजवीकडील पुस्तकाच्या पानातून पुढे प्रवासत जातोय गोदावरीचा चैतन्यदायी प्रवाह... जणू अनंताकडून ग्रंथाकडे अन्‌ ग्रंथातून नदी प्रवाहाच्या माध्यमातून लोकसंस्कृती, सामाजिक जाणीवा समृद्ध करत पुन्हा अनंताकडे जाणाऱ्या वाटा. ग्रंथाच्या मध्यावर साहित्याच्या समतोलाचं प्रतिक असणाऱ्या लेखणीचा केशरी रंग राज्यातील सामाजिक जागराचं, सामाजिक क्रांतीचं अन्‌ नव्या सूर्योदयासमयीच्या क्षितिजाचं प्रतिक दर्शवितो. नव्या विचारांना घेऊन समाजाला जगण्यासाठी ध्येय देण्याची अपार क्षमता असलेली आमची संस्कृती आहे, म्हणून ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ या समर्पक, व्यापक अर्थ असलेल्या ओळींची निवड करण्यात आली. संकल्पना विस्तार श्री. पाटील यांनी केला आहे.  

 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल