Marathi Sahitya Sammelan : ग्रंथदालनासाठी आता जीएसटी नाही; वागताध्यक्ष भुजबळांसोबत आज चर्चा 

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनासाठी स्‍टॉलधारकांना जीएसटीची अतिरिक्‍त झळ बसणार नसल्‍याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शनिवारी (ता. २०) येथे स्पष्ट केले. 

जीएसटीची रकम परत दिली जाणार

शनिवारपासून नाशिक दौऱ्यावर असलेले श्री. ठाले पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ही भूमिका जाहीर केली. दरम्यान, रविवारी (ता. २१) स्‍वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची भेट घेत श्री. ठाले-पाटील नियोजनाबाबत चर्चा करणार आहेत. संमेलनातील ग्रंथप्रदर्शन व विक्रीसाठी साडेसहा हजार रुपये शुल्‍क व त्‍यावर १८ टक्के जीएसटी आकारावा, अशा सूचना संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाकडे महाराष्ट्र सरकारकडून आल्या होत्या. त्यानंतरही बुकिंग झालेल्या स्टॉलधारकांनी जीएसटीसह रक्कम अदा केली होती. मात्र, आजच्या बैठकीत ठाले-पाटील यांनी साडेसहा हजार रुपयांव्यतिरिक्त कोणतेही शुल्क आकारू नये, अशी सूचना आयोजकांना केली. त्यामुळे बुकिंग झालेल्या स्टॉलधारकांना जीएसटीची रकम परत दिली जाणार आहे. प्रदर्शनस्थळी खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर मात्र १८ टक्के जीएसटी आकारला जाणार असल्‍याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
 

ड्रॉच्या माध्यमातून स्टॉलचे वितरण

नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात जवळपास चारशे स्टॉल असून, त्याची नोंदणी ७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. २५ मार्चला ड्रॉच्या माध्यमातून स्टॉलचे वितरण केले जाणार आहे. संमेलनाच्या नियोजनाबाबत येत असलेल्या अडचणींबाबतही या बैठकीत चर्चा झाली. विशेषत: कवीकट्टा उपक्रमात येणाऱ्या अडचणींबाबत काही सूचना त्यांनी केल्या आहेत. बैठकीप्रसंगी, महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सदस्य सुनीताराजे पवार, कुंडलिक अतकरे, ग्रंथप्रदर्शन समितीचे प्रमुख वसंत खैरनार, उपप्रमुख पंकज क्षेमकल्याणी, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह भगवान हिरे, किरण समेळ, चंद्रकांत दीक्षित आदी उपस्थित होते. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

आज महत्त्वपूर्ण घोषणांची शक्‍यता 

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील यांच्यासह दादा गोरे रविवारी (ता. २१) दुपारी दीडला पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची भेट घेऊन संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहेत. यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार असून, या वेळी महत्त्वाच्‍या घोषणा करण्याची शक्‍यता आहे.