Marathi Sahitya Sammelan : जिल्ह्यातील आमदारांच्या निधीतून ९० लाखांची मदत; अजित पवारांचे शिक्कामोर्तब 

नाशिक : गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणात लोकहितवादी मंडळातर्फे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारीअखेरीस ५० लाखांच्या अनुदान मंजुरीची घोषणा केली होती. त्यानंतर आता जिल्ह्यातील १८ आमदारांच्या निधीतून ९० लाखांची मदत मिळण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होईल. 

स्वागताध्यक्षांच्या कामकाजाला सुरवात होताच उद्‌घाटक निश्‍चितीचे संकेत 
स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने ते उपचारासाठी मुंबईला गेले होते. कोरोनाविषयक चाचणी सोमवारी (ता. ८) केली जाणार आहे. ती निगेटिव्ह आल्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या फीट झाल्यावर भुजबळ हे कामकाजाला सुरवात करतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. स्वागताध्यक्षांच्या कामकाजाला सुरवात होताच, संमेलनाचे उद्‌घाटक निश्‍चित होण्याचे संकेत मिळत आहेत.

निधीतून संमेलनासाठी मदत मिळण्याचे आवाहन

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संमेलनासाठी अनुदान जाहीर केल्यानंतर भुजबळ यांनी जिल्ह्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून संमेलनासाठी मदत मिळावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यातील विधानसभासह विधान परिषदेच्या अशा एकूण १८ आमदारांनी संमेलनासाठी निधी देण्याचे पत्र दिले होते. 

हा विषय अर्थमंत्रालयाकडे गेला होता
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री नाशिक विभागाच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आले असताना आमदार निधीतून संमेलनासाठी निधी मिळण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. त्यानुसार हा विषय अर्थमंत्रालयाकडे गेला होता. त्यास उपमुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यापर्यंत पोचली. यासंबंधाने भुजबळ यांच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली असल्यास दुजोरा मिळाला.

तर्कवितर्क सांस्कृतिक पंढरीत

राज्य सरकारकडून आदेश जारी झाल्यानंतर आमदार निधीतून संमेलनासाठी मिळणाऱ्या निधीचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, गीतकार जावेद अख्तर आदींच्या नावावर विचारविनिमय करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलनाचे उद्‌घाटक नेमके कोण असतील? याविषयीचे तर्कवितर्क सांस्कृतिक पंढरीत लढविले जात आहेत. 

जिल्हा नियोजनकडून निधीची शक्यता 
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले अनुदान, आमदारांच्या निधीला उपमुख्यमंत्र्यांनी दर्शवलेली अनुकूलता यापाठोपाठ जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संमेलनासाठी २५ लाखांची मदत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समितीच्या मान्यतेनंतर संमेलनासाठी उपलब्ध होणारा निधी एक कोटी ६५ लाखांच्या आसपास पोचणार आहे. जिल्ह्याच्या १५१ वर्षांच्या वाटचालीच्या उपक्रमाची सुरवात संमेलनातून होणार असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधीबद्दल संयोजकांना अपेक्षा आहे. निधीच्या उपलब्धतेची स्पष्टता होताच, आयोजकांकडून दहा प्रकारच्या व्यवस्थांसाठी निविदा जारी केल्याचे दिसून येत आहे.