Marathi Sahitya Sammelan : मुंबई, पुणे, औरंगाबादला थेट प्रसारण; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना  

नाशिक : नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुंबई, पुणे आणि औरंगाबादला थेट प्रसारण होणार आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी शनिवारी (ता.१३) नियोजन भवनात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. 

दराडे बंधूंचे पत्र नाही 
भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यातील १६ आमदारांनी साहित्य संमेलनासाठी स्थानिक विकास निधीतून एक कोटी ४५ लाखांचा निधी दिला आहे. येवला येथील आमदार दराडे बंधूंचा अपवाद सोडला, तर सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. दराडे बंधूंकडून मात्र अद्याप पत्र आलेले नाही. राज्य शासनाने ५० लाखांचा निधी दिला आहे. तीन कोटींचे नियोजन असले तरी ते वाढण्याचा अंदाज आहे. साहित्य संमेलनासाठी आजच्या बैठकीत हॉटेल व्यावसायिकांनी मोफत खोल्या देण्‍याचे जाहीर केले. त्यात, सूर्या हॉटेल (३०), सिटी प्राइड (४१), सेव्हन हेवन (२८), फॉम्युर्ला वन (१०१), ग्रँड रियो (२५) यांनी खोल्या देण्याचे जाहीर केले. शैक्षणिक संस्थांपैकी संदीप फाउंडेशन व एमईटी संस्थांनी २०० खोल्यांत व्यवस्था करण्याचे कबूल केले आहे. याशिवाय ‘मविप्र’सह इतरही अनेक संस्था मदत करणार आहेत, असे सांगत त्यांनी सहकारी बँका, निमा, आयमा, क्रेडाई, नरडेको आदी संस्थांना निधीसाठी आवाहन केले. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपविली. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

समिती सदस्यांना आवाहन 
साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी विविध ३९ समित्या नेमल्या असून, त्यात दीड हजार स्वयंसेवक असून, बाहेरून वर्गणी जमा करण्यापूर्वी प्रत्येक सदस्यांकडून किमान पाच हजार तरी वर्गणी यावी. केवळ शंभर, दोनशे रुपयांच्या पावत्या फाडून कार्यकर्ता म्हणून घेणे योग्य नाही, असेही सुचविले. आयोजकांकडून माध्यमांना परस्पर माहिती दिली जात असल्याबद्दल पालकमंत्री भुजबळ यांची नाराजी आज तिसऱ्यांदा दिसली. साहित्यिकांच्या पहिल्या बैठकीत, २५ जानेवारीला बैठकीत, त्यानंतर दुसऱ्यांदा भुजबळ फार्मवर गेल्या रविवारी (ता.७) झालेल्या बैठकीत, तर माजी खासदारांच्या नावावरून झालेल्या आणि आज पुन्हा तिसऱ्यांदा जिल्हा नियोजन भवनात झालेल्या बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांपासून सावध तसेच दूर राहण्याचा सल्ला देत प्रसारमाध्यमांना एकवाक्यता असलेल्या तयार प्रेस नोट देणारी व कमी बोलणारी माणसं नेमावी, अशीही सूचना मांडली. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

बालसाहित्य मेळावा आकर्षण 
साहित्य समंलेनात बचतगटाचे ४०० स्टॉल उभारले जाणार असून, पर्यटन, चित्रकला, शिल्पकला, प्रकाशन कट्टा, कवीकट्टा यासाठीसुद्धा वेगवेगळ्या स्टॉलची उभारणी करणयात येणार आहे. कवीकट्ट्यात आजपर्यंत एक हजार ५३२ कविता प्राप्त झाल्या. संमेलनात बालगोपाळांसाठी तीनदिवसीय बालसाहित्य मेळावा होणार असून, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संमेलनातील बालसाहित्य मेळावा संमेलनाचे आर्कषण ठरणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.  

पालकमंत्री : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना 

साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी शनिवारी शहरातील उद्योजक, व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांसह बँकांची बैठक झाली. त्यात, नाशिकचे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. 
महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सदस्य गणेश गिते, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी 
अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.