नाशिक : येथील गोखले शिक्षण संस्थेच्या आवारात लोकहितवादी मंडळातर्फे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ते अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचविण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये केले जाईल, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक तथा मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.
साहित्य संमेलनाचे राज्यातील पाच शहरांमध्ये थेट प्रक्षेपण
जातेगावकर म्हणाले, की स्थळनिश्चितीनंतर सर्व्हेअर्सच्या माध्यमातून कामांनी वेग घेतला आहे. नाशिकमधील मराठी साहित्य संमेलन हा एक लोकोत्सव करण्याचा संकल्प लोकहितवादी मंडळाने सोडला असून, कोरोनानंतरच्या काळात होणारे हे संमेलन म्हणूनच महत्त्वाचे आहे. गेल्या दहा महिन्यांपासून निद्रावस्थेत गेलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था आणणारा हा सोहळा भव्य-दिव्य करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. लोकांनी दिलेला प्रत्येक रूपया आमच्यासाठी महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. तो सत्कारणी लावला जाईल.
हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल
राज्यातील पहिलाच प्रयोग ठरेल,
संमेलनाध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड झाल्याने साऱ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे हे संमेलन एकाच वेळी राज्यातील पाच शहरांमधील मोठ्या सभागृहात व मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपित करण्याचा कार्याध्यक्ष हेमंत टकले यांचा मानस असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो राज्यातील पहिलाच प्रयोग ठरेल, असेही जातेगावकर म्हणाले.
हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल
उपस्थिती वाढण्याची शक्यता
सद्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात केवळ पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी आहे. मात्र केंद्र सरकार फेब्रुवारीमध्ये ही सवलत वाढविण्याची शक्यता असल्याने संमेलनाला ७५ टक्के अथवा शंभर टक्के उपस्थितीला परवानगी मिळू शकते. लोकसहभागातून साजरा होणा-या सोहळ्यातील प्रत्येक रूपया सत्कारणी लावत नाशिकमध्ये होणारे तिसरे साहित्य संमेलन यशस्वी करणार, असा विश्वासही जातेगावकर यांनी व्यक्त केलायं.