नाशिक : ९४ वे अखिल भारतीय संमेलन पुढे ढकलले गेले असल्याची चर्चा मंगळवारी (ता. २३) समाज माध्यमांवर सुरू होती. यानंतर लोकहितवादी मंडळाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, संमेलन पुढे ढकलले नसल्याचे सांगतानाच सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका असल्याचे जाहीर केले.
नियोजनाप्रमाणे तयारी सुरू असल्याचा निर्वाळा
संमेलनाच्या तयारीसाठी सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे. नियोजनासाठी काही समित्या ऑनलाइन, तर काही समित्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत प्रत्यक्ष बैठकी घेत आहेत. शासनाच्या निर्देशानुसारच काम पार पडेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाची स्वागत समिती सल्लामसलत करून पुढील निर्णय घेईल. संमेलनासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी असल्याने सध्यातरी वेट ॲन्ड वॉचची भूमिका ठेवावी लागणार असल्याचे संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
मध्यवर्ती कार्यालयात व्याकरणाचे वाभाडे
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात सुरू केलेल्या संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयात विविध बैठका होत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कार्यालयात सावधगिरी बाळगली पाहिजे, यात शंका नाही. परंतु सावधगिरी बाळगण्याचा गंभीर संदेश ज्या पद्धतीने लिहिण्यात आलाय, ते सूचना फलक पाहून हसू आल्यावाचून राहत नाही. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात बैठकव्यवस्था केलेली आहे. कृपया ती न हलवता तशीच ठेवावी,’ या वाक्यावरून हशा पिकत आहे. साध्या सोप्या भाषेत, खुर्च्या हलवू नये किंवा शारीरिक अंतर ठेवून बसावे, असा संदेश जास्त संयुक्तिक ठरला नसता का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले