Marathi Sahitya Sammelan : संमेलनात २३ तास चालणार कविसंमेलन; कवी कट्ट्यासाठी देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान होणार असून, यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कवी कट्टा, बालकवी कट्टा, मेळावा अशा विविध कार्यक्रमांची मेजवाणी असणार आहे. संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाने संमेलनात कवी कट्ट्यांतर्गत महाराष्ट्रातून कविता, गझल मागविल्या होत्या. कवी कट्टा उपक्रमाला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन हजार ७५० कविता संयोजकांना प्राप्त झाल्या आहेत. कवींना गुरुवारी (ता.२५) कविता पाठविण्याची शेवटची संधी होती. 

कविकट्टा सभामंडपातील काव्यदर्शनमध्ये विविध प्रसिद्ध कवीच्या गाजलेल्या कवितांची पर्वणी रसिकांना अनुभवायास मिळणार आहे. तसेच त्याला कॅलिओग्राफीची जोड असल्याने कविकट्टा आकर्षण ठरणार आहे. कवितेच्या निवडीबाबतचे काव्यदर्शन आकर्षण करण्याबाबत चर्चा, सूत्रसंचालन, निवड होणाऱ्या कवींच्या वेळापत्रकासोबत शिस्तबद्ध होण्यासाठी नियोजनावर कविकट्टा समितीकडून भर दिला जात आहे. कविसंमेलनासाठी कविता स्वरचित असण्याबरोबरच वीस ओळीतच असावी, असे विविध निकष लावण्यात आले होते. कवितेचे सादरीकरण कवींना तीन मिनिटांत करावे लागणार आहे. कवींनी कविता सादरीकरण केल्यानंतर कवीला संयोजकांकडून सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

देशभरातील कवींकडून २७५० कविता 

कुसुमाग्रजनगरी गोखले एज्युकेशन सोसायटी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयातही महाराष्ट्रातून पोस्टाने, मेलवर कविता मागविण्यात आल्या होत्या. त्यात २९५ कविता पोस्टाने आल्या असून, मेलवर दोन हजार ४५२ कविता अशा एकूण दोन हजार ७५० कविता प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या दोन हजार ७५० कवितांमधून कविकट्टा समिती अंतिम ४६० कविता निवडणार आहे. त्या कविता संमेलनात वाचण्यात येणार आहेत. संयोजकांनी कविकट्ट्यासाठी ३९ तासांचे नियोजन केले होते. मात्र ते बदलण्यात येऊन २३ तास करण्यात आले आहे. मात्र नियोजित २३ तासांपेक्षा अधिक वेळ कविसंमेलनाला देण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे. 

कविकट्ट्यासाठी अंजली चितळे, रिया लोटलीकर, संजय घुग्रेटकर, मंद सुंगिरे, सानिका देसाई (गोवा), कविता वालावलकर (कर्नाटक), वैजयंती दांडेकर, अंजली मराठे, वैशाली भागवत (गुजरात), उषा ठाकूर, रजनी भारतीय (मध्य प्रदेश), राधिका गोडबोले (नवी दिल्ली) यांचा सहभाग आहे, अशी माहिती कविकट्टा समितीप्रमुख संतोष वाटपाडे यांनी दिली. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

दोन कविता परदेशातून 

मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनासाठी परदेशातूनही संयोजकांना प्रतिसाद मिळाला असून, कविकट्ट्याला अमेरिका, सिंगापूरमधून प्रत्येकी एक कविता प्राप्त झाली आहे. त्यात अमेरिकेतील इसेलिन न्यूजर्सीमधून डॉ. गौरी जोशी-कन्सारा यांनी, तर सिंगापूरमधून स्मिता भीमनवार यांनी कविता पाठविल्या आहेत. 

बालकट्ट्याला शाळांमधून प्रतिसाद 

साहित्य संमेलनात कविकट्ट्याबरोबरच पहिल्यांदाच बालकट्ट्याचा अनुभव सारस्वतांसह रसिकांना मिळणार असून, बालकट्ट्यासाठी महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३०० हून अधिक कथा, कविता बालकविकट्टा समितीला प्राप्त झाल्या आहेत. तसेच बालकट्ट्यासाठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. नाशिकसह इतर जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचाही बालकट्ट्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

बुकेऐवजी पुस्तक भेट देणार 

संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात सारस्वतांसह पाहुण्या रसिकांच्या सन्मानावेळी दरवेळी बुकेचा वापर करण्यात येतो. यंदा मात्र बुकेऐवजी पुस्तक भेट देण्यात यावीत, अशी सूचना आली आहे. संयोजकांनी या सूचनेवर सकारात्मक विचार केल्याचे समजते.