Marathi Sahitya Sammelan : सारस्वतांच्या उपस्थितीवर कोरोनामुळे प्रश्‍नचिन्ह; शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

नाशिक : पंधरा दिवसांपासून सगळीकडेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सारस्वतांच्या उपस्थितीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहेत. 

सारस्वतांच्या उपस्थितीवर कोरोनामुळे प्रश्‍नचिन्ह
संमेलनासाठी लोकहितवादी मंडळातर्फे चोख नियोजन केले जात असून, नियोजित तारखांनाच संमेलन होईल, असा आशावादही व्यक्त केला जात आहे. शिवाय संमेलनात येणाऱ्या पाहुण्यांच्या नोंदणीसही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, विदर्भ, मराठवाड्यातील कोरोनाची परिस्थिती यामुळे राज्यासह देशभरातील किती सारस्वत आणि साहित्यरसिक कुसुमाग्रजनगरी गाठतील, याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. आयोजकांकडून पाहुण्यांसाठी शहरातील विविध हॉटेल्स, मंगल कार्यालये, लॉन्स संमेलनाच्या तीनही दिवसांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तरीही, कोरोनाच्या स्थितीमुळे नियोजन करताना मोठी कसरत होणार आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

साहित्य महामंडळ, शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
असे असले तरी संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजकांनी केला असून, विविध ३९ समित्यांचे कामकाज ऑफलाइन-ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. संमेलनासाठी साधारणतः सात हजारांहून अधिक पाहुणे येतील असा अंदाज असून, त्यानुसार कोविडचे नियम पाळून चोख नियोजन केले जाणार आहे. नाशिकमध्ये संमेलनाची घोषणा झाली तेव्हा नियोजनासाठी ९० दिवसांचा कालावधी होता. आता मात्र, २२-२३ दिवसच बाकी आहेत. त्यातच गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात एक हजार ८५५ रुग्ण वाढले आहेत. जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून शाळा १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर संमेलनाबाबत साहित्य महामंडळ, शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा
नाशिकमधून सर्वाधिक कविता 

कवी कट्ट्यासाठी कविता पाठविण्याच्या मुदतीपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण दोन हजार ७५० कवितांमध्ये सर्वाधिक प्रमाण नाशिकमधील कवितांचे आहे. प्रमाण मराठी भाषा, विविध बोलीभाषा, गझल यांचाही त्यात समावेश आहे. त्यापैकी ४६७ कवितांची सादरीकरणासाठी निवड झाली असून, त्यात ७० पेक्षा जास्त कविता या नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ विदर्भातून जास्त कविता निवडण्यात आल्याचे कळते. कवी कट्टा २३ तास चालणार असून अहिराणी, भोयरी गझल, बोलीभाषांच्या कवितांचाही त्यात समावेश आहे.