Marathi Sahitya Sammelan : साहित्यरसिक बालकांनाही परिसंवादाची विशेष मेजवानी; नियोजनासाठी समित्यांच्या बैठकांना वेग 

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालसाहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांचा एक परिसंवाद होणार आहे. संमेलनात सहभागी होणारी बालके व त्यांच्या पालकांसाठी हा परिसंवाद असेल. 

संमेलनाचे नियोजन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विविध समित्यांच्या बैठकांना वेग आला असून, काही महत्त्वाच्या समित्यांची शुक्रवारी (ता. १२) बैठक झाली. त्यांपैकी बालसाहित्य संमेलन समितीच्या मुख्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी बालकवी कट्ट्यांतर्गत विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात नोंदणी, निवड, संपर्क, मंच व्यवस्थापन, प्रमाणपत्र, सूत्रसंचालन, कथा सादरीकरण, परिसंवाद, गप्पागोष्टी, सल्लागार आदी समित्यांचा समावेश आहे. लेखकांशी मुलांचा संवाद या उपक्रमांतर्गत गप्पागोष्टींचा वेगळा कार्यक्रम होणार आहे. संजय करंजकर, संतोष हुदलीकर, सोमनाथ मुठाळ, योगिनी जोशी आदींसह सदस्य उपस्थित होते. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

सूक्ष्म नियोजन करणार 

संमेलनाच्या प्रसिद्धी व माध्यम नियोजन (जनसंपर्क) समितीची पहिली बैठकही शुक्रवारी झाली. समितीचे प्रमुख अभिजित चांदे यांनी समितीचे कार्य, नियोजन, तसेच पत्रकारांच्या सुविधा, व्यवस्था आणि सदस्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. इतर भाषिक वृत्तपत्रांसाठी मराठीचे हिंदी- इंग्रजीत भाषांतर करू शकणाऱ्यांनी या समितीत सहभागी व्हावे, असे आवाहन जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी यांनी केले. समितीच्या उपप्रमुख सुप्रिया देवघरे, अतुल जोशी, सुभाष पाटील, दिलीप साळवेकर, राधिका गोडबोले, पद्माकर देशपांडे, विवेक देशपांडे, गोरख भालेराव, दिगंबर काकड आदी उपस्थित होते. 

प्रवेशद्वारावर प्रथमोपचाराची सोय 

आपत्कालीन समितीच्या बैठकीत संमेलनाच्या दृष्टीने येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्कालीन समस्या, उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रथमोपचाराची सोय करण्यात येणार आहे. समितीप्रमुख संजय भडकमकर, नीलेश तिवारी, मोनल नाईक, अमित शहा, मिलिंद पत्की, डॉ. राजेंद्र नेहेते आदींसह सभासद उपस्थित होते. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्या 

दरम्यान, संमेलनासाठी उभारण्यात येणाऱ्या मुख्य व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी श्रीकांत बेणी यांनी पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हटले आहे, की संमेलनस्थळी प्रवेशद्वारांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नाटककार वसंतराव कानेटकर, गोविंद त्रिंबक दरेकर यांची नावे देण्यात यावीत. शहरातील कॅनडा कॉर्नर ते महात्मानगर या मार्गावर स्वागत कमानी उभारून त्या कमानींना साहित्यिक बाबूराव बागूल, लक्ष्मीबाई टिळक, डॉ. अ. वा. वर्टी, दादासाहेब फाळके, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, कृ. वि. वझे इंजिनिअर, वामनदादा कर्डक, गजाभाऊ बेणी, मु. शं. औरंगाबादकर, दादासाहेब पोतनीस, ग. वी. अकोलकर, शांताबाई दाणी, डॉ. वि. म. गोगटे, विनायकदादा पाटील, भीष्मराज बाम, दत्ता भट, बाबूराव सावंत, बापू नाडकर्णी यांची नावे देण्यात यावीत, असेही पत्रात म्हटले आहे.