Marathi Sahitya Sammelan : स्थगितीमुळे नियोजन कोलमडणार! निमंत्रणे पुन्हा पाठवावी लागणार   

नाशिक : संमेलनाचे २६ ते २८ मार्च या तारखा गृहीत धरून करण्यात आलेले नियोजन कोलमडणार असल्याचे चित्र आहे. नियोजित तारखांनुसार निमंत्रित पाहुण्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया दोन दिवसांपूर्वीच पूर्ण झाली होती. मात्र, आता पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. आतापर्यंत संमेलनाच्या नियोजनावर साडेतीन लाखांवर निधी खर्च झाला आहे. त्यामुळे अंदाजित खर्चही वाढू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

निमंत्रणे पुन्हा पाठवावी लागणार  
दरम्यान, संमेलन स्थगित झाल्याचे पत्र संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्षांसह निमंत्रित पाहुण्यांना पाठविण्यात आले असून, पुढील तारीख निश्‍चित झाल्यानंतर नव्याने निमंत्रण पाठविले जाणार आहे. त्याचवेळी, सारस्वतांसह साहित्यिक रसिकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेवर परिणाम होणार नसून, व्यवस्था नियोजितच असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

समित्यांचे कामकाज सुरूच 
संमेलनाच्या नियोजनासाठी ३९ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांचे कामकाजही सुरू आहे. मात्र, संमेलन पुढे ढकलण्याच्या शक्यतेमुळे समिती सदस्यांमध्ये संभ्रम होता. आयोजकांनी हा संभ्रम दूर करत समित्यांच्या बैठकांसोबत होणारे कामकाज सुरळीत सुरू झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संमेलनाला स्थगिती मिळाल्यानंतरही रविवारी संमेलनस्थळी नियोजित विविध समित्यांच्या बैठका झाल्या. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

धार्मिक, सांस्कृतिक ओळख असणाऱ्या नाशिक शहराला साहित्य संमेलन हा महत्त्वाचा ठेवा आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. असे असले तरी संमेलनाच्या नियोजनाच्या दृष्टीने अधिक वेळ उपलब्ध होऊन चांगली तयारी करण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा कमी होईल त्यानुसार संमेलनाची तारीख ठरविण्यात येईल. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन भव्यदिव्य असे होईल, असा विश्वास व्यक्त करतो. -माजी खासदार समीर भुजबळ, संमेलन समन्वयक 

संमेलनाचं नियोजन करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळणार आहे. कोणत्याही समितीने काम थांबवायचे नसून, अधिकाधिक अचूक आणि सूक्ष्म नियोजन कसे करता येईल, यावर भर द्यायचा आहे. घाईगडबडीत राहून गेलेल्या उणिवा दूर करण्याची संधी आहे. संमेलन आपल्या सर्वांच्या मेहनतीने यशस्वी व ‘न भूतो न भविष्यती’ होणार यात शंका नाही. -विश्‍वास ठाकूर, मुख्य समन्वयक 

काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांचा विचार केला आहे. या पार्श्‍वभूमीवर संमेलन स्थगित करण्याचा निर्णय चर्चेनंतर व सारस्वतांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. त्यामुळे संमेलनाच्या कामकाजाला अधिक वेळ मिळेल. -मुकुंद कुलकर्णी, सहकार्याध्यक्ष 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वाढता प्रसार लक्षात घेता संमेलन स्थगित होणे ही खरंतर इष्टापत्ती आहे. त्यामुळे संयोजनाच्या तयारीला अधिक वेळ मिळेल आणि संमेलन अधिक नीटनेटके व्हायला मदत मिळेल, असा विश्‍वास वाटतो. साहित्य संमेलनाच्या इतिहासात स्थगित झालेले हे पहिलेच संमेलन आहे. ते अखेरचे स्थगित झालेले संमेलन ठरावे, अशी इच्छा आपण बाळगू या. -डॉ. शंकर बोऱ्हाडे, कार्यवाह