Motivational : ‘खाकी वर्दीतील नझीम शेख’ रहिवाशांसाठी ठरताहेत ‘ऑक्सिजन’!

म्हसरूळ (नाशिक) : जाती-धर्माच्या मुद्यावर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे प्रसंग असो की सध्याच्या कोरोनाकाळात घरच्यांसह शेजारच्यांनी पाठ फिरविणे असो, रोजच अशा नकारात्मक बातम्या कानावर पडत असतात...मात्र नेमक्या अशाच वातावरणात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याची ओरड करत प्रशासनाला दोष देणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी एक सुखद घटना घडली आहे. खाकी वर्दीतील 'नजीम शेख' यांनी आजूबाजूच्या रहिवाश्यांसाठी चक्क कर्ज काढून थेट ऑक्सिजन मशीनच खरेदी केले आहे.

'खाकी वर्दीतील नझीम शेख' रहिवाशांसाठी बनलाय 'ऑक्सिजन'
प्रभाग क्रमांक तीन मध्ये रासबिहारी लिंक रोड वरील सरस्वती नगर येथील सागर स्पंदन सोसायटीतील एकतीस वर्षीय नझीम शेख हा मूळचा नाशिकचाच. आई वडिलांनी मोलमजुरी करीत नझीमचे शिक्षण पूर्ण केले. नझीमनेही आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन पुढे पोलीस भरतीत नाव कमावले. सद्यस्थितीत शेख हे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. बालपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शेख यांना आजही हा छंद शांत बसू देत नाही. सतत काहीना काही सामाजिक कार्यात व्यग्र राहणाऱ्या नझीम यांनी राहत्या परिसरातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी सरस्वती नगर मित्र मंडळाची स्थापना केली आहे. या ठिकाणी अनेक सामजिक कार्यक्रम घेतले जातात.

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

सामजिक बांधिलकी : कर्ज काढून घेतले ऑक्सिजन मशीन...!

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसागणिक बाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोवपरी प्रयत्नदेखील सुरू आहे. परंतु आजची परिस्थिती बघता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळणे फार अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णवाढ रोखण्यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र झटत आहेत.।आपल्या परिसरातील कुणास ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास आजमितीस ती उपलब्ध करणे फार जिकिरीचे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही जण यंत्रणेला दोष देत आहेत, तर काही जण आपापल्या परीने मदतीसाठी सरसावले आहेत. मात्र पोलीस शिपाई नझीम शेख यांनी याही पलीकडे जाऊन वेगळी शक्कल लढवली आहे. त्यांनी कर्ज काढून स्वखर्चाने लाईटवर चालणारे व स्वच्छ पाण्यातून ऑक्सिजन तयार करणारे मशीनच विकत घेतले आहे. यामुळे परिसरातील एखाद्या बधिताला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास ते मशीन त्यास वापरासाठी विनामूल्य दिले जाणार आहे. यामुळे बधितांना घरीच उपचार घेता येणार असून, हॉस्पिटलला भरमसाठ बिल भरण्याची वेळही येणार नाही आणि प्राणही वाचण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

खाकी वर्दीचीही प्रतिमा चकाकण्यास मदत

शेख यांनी हे मशीन सरस्वती मित्र मंडळास भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच खाकी वर्दीतील हा नझीम शेख परिसरातील रहिवाशांसाठी 'ऑक्सिजन' ठरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या या कार्यामुळे काही अपवादात्मक घटनांमुळे डागाळलेल्या खाकी वर्दीचीही प्रतिमा चकाकण्यास मदत होणार आहे.