Motivational story : महाविद्यालयीन तरुणांकडून चिमुकल्यांना बाराखडी अन् एबीसीडीचे धडे; घराच्या अंगणात, झाडाखाली भरविली शाळा

येवला (जि.नाशिक) : शाळा बंद असल्याने बालवाडी, पहिली, दुसरीच्या वर्गात जाणाऱ्या चिमुकल्यांचे शिक्षण बंद आहे. यातच ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचेदेखील तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे क, ख, ग, घ अन् ए, बी, सी, डी, या अक्षरओळखचा विसर काही चिमुकल्यांना पडला आहे. पण या लहानग्यांच्या शिक्षणासाठी विखरणी (ता. येवला) गावातील महाविद्यालयीन तरुण पुढाकार घेत मुलांच्या घरी जाऊन झाडाच्या सावलीत त्यांना बाराखडी अन् एबीसीडीचे धडे देत आहेत. 

बाराखडी अन् एबीसीडीचे धडे
लॉकडाउनमुळे अजूनही शाळा सुरू झालेल्या नसल्याने प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. शाळांना कुलूप लागायला आता वर्ष होत आल्याने चिमुकल्यांचा शाळेचा लळा तुटल्याने वर्गाची अन् अक्षरांचीदेखील ओळख विसरण्याची स्थिती झालेली आहे. त्यामुळे आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांचा अन् ज्ञानाचा झरा अखंडपणे वाहत राहावा यासाठी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

घराच्या अंगणात, झाडाखाली भरवितात शाळा, शिक्षकांचीही मदत 
येथील जिल्हा परिषदेच्या बिजलाबाईनगर शाळेच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रवींद्र रोठे व शाळेतील शिक्षकांच्या मदतीने हरिभाऊ वाघमोडे, योगेश शेलार व गीता बिडगर या महाविद्यालयीन तरुणांनी विद्यार्थ्यांना एकत्र येऊन ही आगळीवेगळी शाळा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या घरोघरी निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली, तर कधी चावडीवर एक तास विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास या उपक्रमांतर्गत अध्यापनाचे धडे हे विद्यार्थी देत आहेत. ज्ञानदान करणाऱ्या या तरुणांना शिकविण्यात काही अडचण येऊ नये यासाठी या शाळेतील शिक्षक राजेंद्र घोलप, नितीन शिंदे, मंजूषा जाधव व इतर सहकारी शिक्षक या तरुणांना मदत करत आहेत. शाळा सुरू होत नाही तोपर्यंत हा उपक्रम असाच सुरू ठेवण्याचा निर्धार वाघमोडे व शेलार यांनी व्यक्त केला. बापूसाहेब शेलार, दत्तू शेलार, अरुण शेलार यांच्यासह ग्रामस्थांचे याकामी सहकार्य मिळत आहे. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न