नाशिक : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, रुग्ण संख्येचे नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत. त्यातच येत्या रविवारी (ता.११) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० घेण्याचे नियोजित आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे.
परीक्षार्थींनी घेतला सोशल मिडीयाचा सहारा!
कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत चालली आहे. अशा परीस्थितीत परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. परीक्षा झाल्यास या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याची भिती उमेदवारांकडून व्यक्त होते आहे. राज्यभरात सध्याची परीस्थिती लक्षात घेता, येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरावरुन होते आहे. अवघ्या दोन दिवसांवर परीक्षा येऊन ठेपल्याने शुक्रवारी सकाळपर्यंत कुठलाही धोरणात्मक निर्णय जाहीर झालेला नसल्याने उमेदवारांनी सोशल मिडीयाचा सहारा घेतला.
हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना केले टॅग
त्यातच उमेदवारांनी शुक्रवारी (ता.९) ट्विटरवर सेव्ह एमपीएससी स्टुडंट्स हा कॅम्पेन राबविला. यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना टॅग करताना आपले गार्हाणे मांडले. ट्विटरवर सेव्ह एमपीएससी स्टुंडंट या हॅशटॅगद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यापूर्वी परीक्षेसाठी झाले होते आंदोलन
यापूर्वी गेल्या महिन्यातच एमपीएससीमार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. कोरोनाचा फैलाव लक्षात घेता एमपीएससीने या परीक्षेला मार्चमध्ये स्थगिती दिली होती. परंतु या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटले. अनेक ठिकाणी आंदोलने करताना परीक्षा घेण्याची मागणी झाली होती. राज्यभरात उमेदवारांच्या वाढता आक्रोश लक्षात घेता लागलीच ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेला स्थगिती दिली तर पुन्हा आंदोलनाची शक्यता पाहता एमपीएससीमार्फत नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी होणार्या परीक्षेचे नियोजन सुरु आहे. त्यातच आता परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्यभरातून मागणी होत असताना एमपीएससीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.
हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश
राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन
दरम्यान सोशल मिडीयावर नेत्यांना टॅग करत ट्विट केले जात होते. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टॅग करत अनेक उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर दुपारी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनद्वारे संपर्क साधत परीक्षा पुढे ढलकण्याची विनंती केल्याचा संदेश फिरत होता.