MPSC EXAM : जेव्हा पीपीई किट घालून परीक्षार्थीं पोहचला परीक्षागृहात; परीक्षार्थींना फुटला घाम

नाशिक : कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर उमेदवारांना किट उपलब्‍ध करून देण्यासह अन्‍य उपाययोजना प्रशासकीय यंत्रणेने केल्‍या होत्‍या. 
पहिल्‍या पेपरला परीक्षार्थींना घाम फोडला. जेव्हा 

पीपीई किट घालून परीक्षा

जिल्‍हाभरातील ४५ परीक्षा केंद्रांवर बहुप्रतिक्षित राज्‍य सेवा पूर्वपरीक्षा २०२० अंतर्गत लेखी परीक्षा रविवारी (ता. २१) सुरळीत पार पडली. दोन सत्रांत झालेल्‍या या परीक्षेत १८ हजार ७१ परीक्षार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी सुमारे ६५ टक्‍के उमेदवारांनी केंद्रात उपस्‍थित राहून परीक्षा दिली. कोरोनासदृश लक्षणे असल्‍याची माहिती नाशिक रोड परिसरातील के. जे. मेहता विद्यालयात आसनव्‍यवस्‍था असलेल्‍या एका उमेदवाराने दिली होती. या परीक्षार्थीला पीपीई किट घालून परीक्षेला सामोरे जाण्याची संधी देण्यात आली. त्‍याच्‍यासाठी स्‍वतंत्र खोलीत व्‍यवस्‍था केली होती.

एक तास आधी उमेदवारांना प्रवेश
वारंवार परीक्षा स्‍थगित होत असल्‍याने उमेदवारांचा हिरमोड होत होता. राज्‍यस्‍तरावर झालेल्‍या मागणीनंतर रविवारी राज्‍यभरात ही परीक्षा पार पडली. परीक्षेच्‍या नियोजनात प्रशासकीय यंत्रणेने चोख तयारी केली होती. नियोजित वेळेच्‍या एक तास आधी उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. सकाळी दहा ते दुपारी बारा, या वेळेत झालेल्‍या पेपर क्रमांक एकला सहा हजार २७० उमेदवारांनी दांडी मारली. दुपारी तीन ते सायंकाळी पाच, या वेळेत झालेल्‍या पेपर क्रमांक दोनला सहा हजार ३२३ परीक्षार्थी उपस्‍थित होते. जिल्ह्यातील परीक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर जिल्हा केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी काम पाहिले. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

तैनात कर्मचाऱ्यांची चाचणी 
परीक्षेचे संयोजन करण्यासाठी एक हजार ४६० अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले होते. या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड १९ चाचणी केलेली होती. यात सोळा कर्मचारी पॉझिटिव्‍ह आढळल्‍याने त्‍यांच्‍या जागी राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली गेली. एमपीएससीतर्फे सर्व केंद्रांवर कोविड किट उपलब्‍ध केले होते. यात हॅन्डग्‍लोज, मास्‍क, सॅनिटायझर पाऊच, फेसशील्ड, थर्मल स्‍कॅनर, ऑक्सि‍मीटरचा समावेश होता. तसेच सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्‍त तैनात केलेला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी देत परिस्‍थितीचा आढावादेखील घेतला. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

 

आकडे बोलतात... 
* परीक्षेला प्रविष्ट उमेदवारांची संख्या : १८ हजार ७१ 
* पेपर क्रमांक एक : उपस्‍थित- ११ हजार ८०१, गैरहजर- सहा हजार २७० 
* पेपर क्रमांक दोन : उपस्‍थित- ११ हजार ७४८, गैरहजर- सहा हजार ३२३ 

परीक्षार्थी म्‍हणाले... 
तुषार थेटे : इतिहास विषयाच्‍या प्रश्‍नांची काठिण्य पातळी अधिक होती. एकंदरीत परीक्षा सुरळीत पार पडली असून, आता या परीक्षेच्‍या निकालाकडे लक्ष असेल. परीक्षेचे व्‍यवस्‍थापन उत्‍कृष्ट होते. 

प्रशांत पाटील : चालू घडमोडीविषयक प्रश्‍न सोपे वाटले, तर अन्‍य काही विषयांचे प्रश्‍न काही प्रमाणात कठीण वाटले. खूप दिवसांनी परीक्षेची वाट बघत असल्‍याने आता बरे वाटत आहे. परीक्षेचे संयोजन सुरळीत केलेले असल्‍याने काही अडचण उद्‌भवली नाही. 

प्रवीण गायकवाड : व्‍यवस्‍थापन अतिशय सुरळीत केलेले होते. त्यामुळे माझ्यासह अन्‍य परीक्षार्थींना काही अडचणी आल्‍या नाहीत. पेपर क्रमांक एक सोपा गेला. आता पुढील परीक्षेच्‍या तयारीवर भर असेल. 

दानिश शेख : परीक्षा केंद्रांवर चांगल्‍या उपाययोजना केल्‍या होत्या. खरंतर यापूर्वीच नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. उशिरा का होईना, सुरळीत परीक्षा घेतल्‍याबद्दल शासनाचे आभार. यापुढेही वेळापत्रकानुसार अन्‍य परीक्षा घ्याव्‍यात, अशी अपेक्षा आहे.