Murder : धुळ्याच्या कारचालकाची मध्य प्रदेशात हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याच्या कारचालकाची मध्यप्रदेशात हत्या झाली आहे. प्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या चौघांनी या तरुणाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचा मृतदेह मध्य प्रदेशात सापडला असून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथकाने तपास सुरू केला आहे.

धुळे शहरातील चितोड रोड लगत असणाऱ्या कैलास नगरात राहणाऱ्या दीपक विष्णू दाभाडे या युवकाचा खासगी प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या मालकीची एम एच 18 बी सी 59 67 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कार मधून तो गरजेनुसार प्रवाशांना सेवा देण्याचे काम करीत होता. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दीपक दाभाडे याला त्याचा मित्र शरद मराठे याने संपर्क केला. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सुयोग लॉज मध्ये थांबलेल्या चौघा युवकांना मध्य प्रदेशातील खंडवा या गावापर्यंत सोडून देण्याचे भाडे असल्याची माहिती मराठे यांनी दिली. त्यानुसार दीपक दाभाडे हा आपली कार घेऊन सुयोग लॉज जवळ पोहोचला. यावेळी कारमध्ये त्याने चौघा युवकांना बसवले. मात्र या चौघांची कोणतीही माहिती त्याच्याकडे नव्हती. दरम्यान रात्री आठ वाजेच्या सुमारास कार मध्ये डिझेल भरण्यासाठी दीपक एका पंपाजवळ थांबला. यावेळी त्याने त्याची पत्नी वनिता दाभाडे हिला मोबाईल वरून संपर्क करून गाडीमध्ये अनोळखी प्रवासी असल्याची माहिती दिली. त्यांचे ओळखपत्र आणि फोटो लवकरच पाठवणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार त्याने एक फोटो व्हाट्सअप वर पाठवला. तसेच अनोळखी प्रवाशांपैकी जगतारसिंग जागीर सिंग असे नाव असलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र देखील त्याने पाठवले. मात्र दुसऱ्या दिवशी दीपक दाभाडे यांचा भ्रमणध्वनी बंद येत असल्याने त्यांची पत्नी चिंतीत झाली. त्यांनी शरद मराठे यांना संपर्क करून दाभाडे यांचा शोध घेण्यास विनंती केली. त्यानुसार दाभाडे परिवारासह मराठे यांनी देखील प्रवाशांपैकी एकाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली. यावेळी संबंधित अनोळखी युवकाने दीपक दाभाडे यांनी मध्यप्रदेशाच्या सीमेवर म्हणजेच बऱ्हाणपूर जवळ पहाटे चार वाजेला सोडल्यानंतर दीपक हा निघून गेल्याची माहिती दिली.

मात्र त्यानंतरही दीपक घरी पोहोचलाच नाही. त्यामुळे धुळे शहर पोलीस ठाण्यात वनिता दाभाडे यांनी हरवल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मध्य प्रदेशातील पोलीस ठाण्यांना दीपकचा फोटो पाठवण्यात आला. दरम्यान बऱ्हाणपूर शहराच्या जवळील शिक्रापूर पोलीस ठाण्यातून धुळे शहर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. यावेळी त्यांनी एक मृतदेह सापडला असून त्याचे वर्णन दीपकच्या फोटोशी जुळत असल्याची माहिती दिली.  मृतदेह दीपक दाभाडे याचाच असल्याची खात्री झाली. दरम्यान दीपक यांच्या डोक्याच्या मागील बाजूस टणक हत्याराने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच घटनास्थळावर त्याची कार देखील आढळून आली नाही. त्यामुळे अनोळखी प्रवासी म्हणून बसलेल्या या तरुणांनी त्याची हत्या करून रोकड आणि गाडी हिसकवून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. मयत दीपक दाभाडे यांनी पाठवलेल्या ओळखपत्रानुसार जगतार सिंग जागीर सिंग हा मुंबईच्या विजयनगर एसपी रोड परिसरातील रहिवाशी असल्याची बाब पुढे आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता तपास चक्रे हलवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

The post Murder : धुळ्याच्या कारचालकाची मध्य प्रदेशात हत्या appeared first on पुढारी.