Site icon

Murder :.. म्हणून मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील युवकाच्या खुनाचे (Murder) गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना यश आले आहे. या तरुणाचा खुनासाठी त्याच्या सख्या आईनेच सुपारी दिल्याची बाब तपासात निदर्शनास आली असून मद्यपी मुलाकडून सर्व परिवारावर होणाऱ्या छळास कंटाळून या मातेने चौघांना खुनाची सुपारी दिल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे.

धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे काल अमोल विश्वास भामरे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह प्रथमदर्शी संशयास्पद परिस्थितीत मिळून आल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली असता या खुनाच्या गुन्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खूनाचा उलगडा झाल्यामुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महिराळे यांच्यासह तपास पथकाची उपस्थिती होती. मयत अमोल भामरे हा खाजगी गाडी चालवण्याचे काम करत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो एका असाध्य आजाराने पीडित असल्यामुळे तो मद्याच्या आहारी गेला होता. मद्याच्या नशेत त्याने सर्व परिवाराला वेठीस धरण्याचे काम सुरू केले होते. याबरोबरच मयतने सुरत येथे राहणाऱ्या त्याच्या मेव्हण्याला देखील व्यसनाच्या आहारी लावले. त्यामुळे त्यांचा परिवार उद्धस्त झाला. मयत अमोल भामरे यांच्यावर अनेक वेळेस अटक होण्याची वेळ आली होती. त्यामुळे त्याच्या जामिनासाठी त्याच्या परिवाराला खर्च करून धावपळ करावी लागत होती. या उपर देखील मयताने त्याच्या परिवारातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला देखील केला होता. त्यामुळे त्याच्याकडून त्याच्या पूर्ण परिवाराला धोका होण्याच्या भितीतून त्याच्या सख्या आईनेच त्याला संपवण्यासाठी गावातील चौघांबरोबर संपर्क केला. या चौघांना 25 हजारांची सुपारी देऊन त्यांनी अमोल भामरे याला रस्त्यातून साफ करण्याचा कट केला. मात्र ही बाब पोलीस तपासात निदर्शनास आल्याने पोलीस पथकाने मयताची आई लताबाई विश्वास भामरे, तसेच खून करणारा पुंडलिक गिरधर भामरे या दोघांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे अन्य दोघा मारेकऱ्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सोनगीर पोलीस ठाण्याचे दोन पथक रवाना करण्यात आले आहेत.

The post Murder :.. म्हणून मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी appeared first on पुढारी.

Exit mobile version