
नाशिक : पुढारी वृवसेवा
आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरील विघ्न दूर व्हावे किंवा इतरांवर ते विघ्न यावे या किंवा तत्सम हेतूने सात कैऱ्या अन् सात दगडांची रस्त्याच्या कडेला उतारा मांडून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या अज्ञातांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डाव उधळला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कैऱ्या या उताऱ्यासाठी नव्हे तर मानवी खाद्यासाठीच असतात, असा संदेश देत त्याचा चवीने आस्वादही घेतला. तसेच परिसरातील नागरिकांना अशाप्रकारच्या कृती या अंधश्रद्धा असून, त्यास कोणीही बळी पडू नये असा संदेशही दिला.
सातपूर, सोमेश्वर कॉलनी परिसरात चारचाकी पार्क केल्या जात असलेल्या रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी पानांवर सात कैऱ्या अन् दगड ठेवून त्यावर हळद-कुंकु टाकले होते. तसेच तिथे नवैद्यही ठेवण्यात आला होता. मंगळवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हा सर्व प्रकार केला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा प्रकार समोर आला, तेव्हा परिसरातील नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली. चारचाकी पार्कींगच्या जागेवर अशाप्रकारे कोणी पूजा केली असावी?, यामागचा नेमका हेतू काय?, करणीचा तर हा प्रकार नसावा ना? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये विशेषत: महिला वर्गात चर्चिले गेले. काहींनी तर हा ‘ब्लॅक मॅजिक’चा प्रकार असावा असाही संशय व्यक्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे नागरिकांनी याठिकाणी वाहने पार्किंग करणेही टाळले. यासर्व प्रकाराचे गांभीर्य ओळखून अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, यशदा चांदगुडे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांचे प्रबोधन केले. अशाप्रकारच्या उताऱ्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असून, यातून काहीही साध्य होत नसल्याची बाब अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पटवून दिली. तसेच उताऱ्यात मांडलेल्या कैऱ्या धुवून त्याचा आस्वादही घेतला. तसेच नागरिकांनी अशाप्रकारच्या उताऱ्यांमुळे घाबरून जावू नये, परिसरात अंधश्रद्धाचा प्रकार घडत असेल तर अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान, अशाप्रकारे उतारा करून भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.
यशदाचे कौतुक
अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये लहानग्या यशदाचे मात्र सर्वांनीच कौतुक केले. यशदाने मनात कुठलीही भिती न बाळगता उताऱ्यातील कैऱ्या उचलल्या. तसेच त्यांचा आस्वादही घेतला. अशाप्रकारच्या उताऱ्यामुळे विघ्न दूर होणे किंवा इतरांना त्यापासून ईजा पोहोचणे ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचा संदेशही तिने यावेळी दिला. तिची ही धाडसी वृत्ती कौतुकास्पद ठरली.
हेही वाचा :
- Sai Tamhankar : सई रंगुनी रंगांत सा-या रंग तुझा वेगळा!
- Karnataka CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा
- Jallikattu Supreme Court Judgement | सांस्कृतिक वारसा न्यायव्यवस्थेचा भाग असू नये, SC कडून तामिळनाडूतील ‘जल्लीकट्टू’ची वैधता कायम
The post Nashik : अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव, रस्त्यावर मांडलेल्या उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद appeared first on पुढारी.