Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’

only admin

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, कुणीही अफवा तसेच दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल करू नयेत अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तरी आठवडाभर सोशल मीडियावरील ग्रुप ‘ओन्ली अडमिन’ या ऑप्शनवर ठेवावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

मंगळवारी येथील पोलिस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉलमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी आगामी आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना तसेच प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी ते बोलत होते. जनावरांची बेकायदेशीर वाहतूक निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. परंतु, कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका, माहितीनुसार तत्काळ कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजमन कलुषित करणारी कोणतीही माहिती शेयर करु नये, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी आपापले सण – उत्सव उत्साहात मात्र शांततेत साजरे करावेत, शहरांतर्गत घडामोडींवर पोलिसांचे लक्ष असून, आवश्यक तो बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपाचे अधिकारी राजू खैरनार, पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ appeared first on पुढारी.