Site icon

Nashik : आदिवासी खाद्य संस्कृतीची नाशिककरांना भुरळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अस्सल गावरान पद्धतीने तयार केलेली खेकड्याची भाजी, खड्डा कोंबडी व तर्रीदार चिकनचा रस्सा, चमचमित मसाल्यात तळलेले मासे आणि जोडीला चुलीवर भाजलेल्या गरमागरम नागली व भाजरीच्या भाकरी अशा आदिवासी खाद्य संस्कृतीची भुरळ नाशिककरांना पडली आहे. निमित्त आहे ईदगाह मैदानावर आदिवासी विकास विभाग आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत महोत्सवातील आदिवासी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे.

चुलीवर भाजलेल्या गरमागरम नागली व भाजरीच्या भाकरी

आदिवासी राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यापर्यंत विस्तारलेल्या आदिवासी सांस्कृतीचे दर्शन होत आहे. राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिला बचतगटांनी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या व्हेज-नॉनव्हेज खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती मिळत आहे. विशेषत: खड्डा कोंबडी, डांगी चिकन, रस्सा कोंबडी, कोकणी चिकन प्लेट (२ भाकरी, १ प्लेट रस्सा, १ वाटी भात, नागलीचा पापड), मडक्यात तयार केलेला भरलेला खेकडा, बांगडा आणि पापलेट फ्राय, बोंबील व सुकटीची चटणी, तांदूळ-नागली व बाजरीची भाकरी आदी पदार्थ खवय्यांना तृप्त करत आहे.

आदिवासी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे

आदिवासी भागातून आणलेल्या रानभाज्यांनाही खवय्यांकडून मागणी येत आहे. त्यात काटवल, हेटी, टाकळा, बांबूचे कोंब, कपाळफोडी, खापरखुटी, गोखरू, कुड्याचे फूल, चाकवत, चिवळी यासारख्या रानभाज्यांचा समावेश आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा आणि नाचणीच्या भाकरीची चवही खवय्यांच्या जिभेवर रेंगाळत आहे. व्हेज-नॉनव्हेजच्या पदार्थांवर खवय्ये ताव मारत आहेत. दरम्यान, महोत्सवात उभारण्यात आलेल्या स्टॉलला विविध वस्तूंची व खाद्य पदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे गत तीन दिवसांत महोत्सवामध्ये लाखोंची उलाढाल झाली आहे.

खड्डा कोंबडी

व्हेज पदार्थांनाही मागणी

नॉनव्हेजप्रमाणेच व्हेज पदार्थांनाही खवय्यांकडून मागणी होत असताना दिसून येत आहे. उडीद डाळ-तांदळाची खिचडी, नाचणीची भाकरी, आळू व कोथिंबीर वडी, शेंगदाणा पुरी, उडदाचा घुट्ट, मासवडी, झुणका भाकर, अनारसे, हरभरा-चणाचाट, वडापाव, भाजणीचे थालिपीठ-चटणी, गूळ शेंगदाणा पोळी, इटली-चटणी आदी पदार्थांवर खवय्ये अक्षरश: तुटून पडत आहेत. व्हेज पदार्थांच्या स्टॉलला खवय्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

अस्सल गावरान पद्धतीने सात प्रकारचे मसाले वापरून खेकड्याची भाजी व चिकनचा रस्सा तयार केला जातो. आदिवासी खाद्य पदार्थांना नाशिककरांची वाढती पसंती मिळत आहे. त्यामुळे महिला बचतगटाचा आत्मविश्वास वाढत आहे. दुर्गम भागात तयार होणाऱ्या व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नाशिककरांनी महोत्सवाला भेट द्यावी.

-सीता किर्वे, सदस्य, महालक्ष्मी महिला बचत गट

हेही वाचा :

The post Nashik : आदिवासी खाद्य संस्कृतीची नाशिककरांना भुरळ appeared first on पुढारी.

Exit mobile version