Site icon

Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेला गंगापुर रोडवरील होरायझन ॲकडमी येथे आज (दि. २३) सुरुवात झाली आहे. बदलीसाठी गेल्या एक महिन्यात जिल्हा रुग्णालयात 641 अर्ज आले असून त्यापैकी 115 अर्ज पात्र करण्यात आले आहेत. तर 53 अर्ज अपात्र आणि तब्बल 349 अर्ज धारकांना पुनर्तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अर्जांमध्ये बाह्य जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा देखिल समावेश असून त्यांची संख्या 76 इतकी आहे. या अर्जांचे अभिप्राय जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात आरोग्य विषयक बोगस प्रमाणपत्र मिळवून बदल्यांचे लाभ घेतले गेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यापासून ते अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून प्रत्येक विभागाने ताक सुद्धा फुंकुन पिण्याचा पावित्रा घेतला असल्याने बदल्यांसाठी आरोग्य प्रमाणपत्र जोडताना काळजी घेतली जात असल्याचे बघायला मिळत होते.

मात्र, जिल्हा परिषदेतील गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेली बदली प्रक्रिया सुरु होणार असल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेतील कर्मचारी जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे झिजवताना दिसत होते. जिल्हा रुग्णालयात 641 अर्ज प्राप्त झाले असले तरी त्यापैकी 349 म्हणजे 55 टक्के कर्मचाऱ्यांच्या अर्जावर साशंकता व्यक्त होत त्यांना पुनर्तपासणीसाठी बोलविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत तर अवघे 115 अर्ज पात्र करण्यात आले आहेत.

याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बदल्यांमध्ये आरोग्य प्रमाणपत्राबाबत काय भुमिका घेतात याकडे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रहार संघटनेने देखिल आरोग्य प्रमाणपत्र पडताळणी करावी तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर या प्रमाणपत्र तपासणीसाठी एक स्वतंत्र सेल स्थापन करावा अशी मागणी केली होती.

जिल्हा परिषदेत एका बाजूला प्रहार संघटनेने ही मागणी केलेली असताना दुसरीकडे कर्मचारी वर्गाकडून देखील दबक्या आवाजात वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोईच्या बदलीसाठी कर्मचारी वर्गाकडून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतला जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी appeared first on पुढारी.

Exit mobile version