Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा

SARAPANCH,www.pudhari.news

नाशिक/त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
ग्रामविकासात उल्लेखनीय बदल व्हावा, या उद्देशाने सक्षम सरपंच तयार होणे आवश्यक आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातील 50 सरपंचांना एकत्र आणत स्वखर्चाने अभ्यास दौरा आयोजित केला होता. सूक्ष्मपणे काम करून राज्यासमोर आदर्श घडविलेल्या हिवरे बाजार, राळेगणसिद्धी या गावांच्या विकासाचा आलेख त्यांना दाखविण्यात आला. या गावांचा झालेला शाश्वत विकास पाहून आपल्याही गावाला विकसित करण्याचा द़ृढ संकल्प सर्व सरपंचांनी यावेळी केला.

दरम्यान, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनीही इगतपुरी तालुक्यात केलेला अभूतपूर्व विकास नजरेसमोर ठेवून विकासाची फळे गावाला देण्यासाठी जिवाचे रान करू, असा निश्चय यावेळी केला. घोटी येथून अभ्यास दौर्‍याचा प्रवास सुरू झाला. आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे भेट देऊन तेथील प्रभावी विकासाची पाहणी करीत सर्व बाबी नोंदवून घेतल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सर्व सरपंचांना मार्गदर्शन करताना, विकासाची विविध सूत्रे उलगडून सांगितली. महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सरपंचांची भूमिका त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितली. पुढील सत्रात पारनेरचे लोकप्रिय आमदार नीलेश लंके यांची भेट घेण्यात आली. आमदार लंके यांनी सर्व सरपंचांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. अभ्यास दौर्‍याच्या शेवटी आदर्श गाव हिवरे बाजार येथील शाश्वत विकासाची पाहणी सरपंचांनी केली. सरपंच पोपटराव पवार यांनी सर्वांना विकासाची नांदी निर्माण करण्यासाठी सूत्रबद्ध माहिती दिली. आमच्याही गावात असा विकास करण्याचा आम्ही निर्धार करीत असल्याचे मत यावेळी सर्वांनी व्यक्त केले. यावेळी गोरख बोडके यांनी इगतपुरी तालुक्याच्या वतीने समाजसेवक अण्णा हजारे, नीलेश लंके आणि आमदार पोपटराव पवार यांचे आभार मानत समृद्ध ग्रामविकासासाठी सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायतींच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा शब्द बोडके यांनी सर्वांना दिला.

या दौर्‍याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, युवराज संभाजीराजे, माजी मंत्री छगन भुजबळ, नांदगावचे आमदार सुहास कांदे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विभागाच्या अधिकारी लीना बनसोड, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी सरपंच दौर्‍याची माहिती घेतली. दूरध्वनीवरून संपर्क साधत उपक्रमाचे कौतुक केले.

हेही वाचा :

The post Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा appeared first on पुढारी.