Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
भावली धरणातून शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची नवीन जलवाहिनी सोमवारी (दि. 4) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंप्रीसदोजवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतून उच्चदाबाने उडणारे पाणी शेतात शिरल्याने भाताचे बियाणेदेखील वाहून गेले. परिणामी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जलवाहिनीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघड पडले आहे.

शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने 38 कोटी रुपये निधीअंतर्गत नळ पाणी योजनेचे काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. भावली धरणातून जलवाहिनीचे काम कासवगतीने सुरू आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी शहरातील रस्त्याच्या मधोमध खोदकाम केलेले आहे. मात्र पिंप्रीसदो रस्त्यालगत जलवाहिनी अचानक फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी परिसरातील शेतीत गेल्याने शेतीचे बांध फुटले, तर अनेकांचे भात लागवडीचे बियाणे वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

‘चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी’
इगतपुरी शहरातील नगर परिषद तलावाचे व तळेगाव येथील जीवन प्राधिकरण तलावाचे पाणी शहराला कमी पडत असल्यामुळे गेल्या चार वर्षांपूर्वी भावली धरणातून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून योजनेचे काम सुरू आहे. जलवाहिनीच्या खोदकामात खासगी कंपनीची केबल टाकल्याने भविष्यात शहरातही मोठ्या प्रमाणावर जलवाहिनी फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.