
नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीत झालेली जळीत घटना अत्यंत दुर्दैवी असून राज्य शासनाच्या वतीने आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. आग पूर्णपणे विझल्यानंतर मृत्यूचा आकडा वाढू शकतो अशी भिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केली. मंत्री खाडे यांनी सोमवार (दि. २) रोजी दुपारी प्रत्यक्ष जिंदाल कंपनीत येऊन आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ज्या ठिकाणी ही आग लागली त्या ठिकाणी आणखी किती कामगार अडकलेले आहेत आणि किती मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच मिळू शकेल असेही खाडे यांनी यावेळी सांगितले.
फोम आणि केमिकल पावडर यांच्या मिश्रणाने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोमचा वापर करण्यात येत असून आज सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णता: नियंत्रण मिळविण्यात अग्निशामन दल, एनडीआरएफ, सीआरपीएफच्या यंत्रणांना यश येईल असेही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले. दुर्घटने दरम्यान कंपनीत नेमके कीती कामगार कामावर होते व किती कामगारांना बाहेर काढण्यात यश आले तसेच किती कामगार आतमध्ये अडकलेले आहेत, याबाबत कंपनीच्या रजिस्टरची चौकशी करून माहिती घेण्यात येणार असल्याचे कामगारमंत्र्यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत नववर्षाच्या दिवशी रविवार (दि. १) सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर १७ कामगार जखमी झाले. २४ तास उलटूनही या प्लान्टमधून आगीचे लोट आणि धूर बाहेर येतच आहे. आग लागलेल्या या प्लान्टमध्ये काही केमिकलचा साठा आहे. जो पर्यंत हे सर्व केमिकल पूर्णपणे जळून जात नाही तो पर्यंत आग पूर्णता: नियंत्रणात येणार नाही अशी माहिती प्रत्यक्ष दर्शिंनी यावेळी कामगारमंत्री खाडे यांना दिली. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस करीत भेट घेतली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रशासन माहिती लपवत असल्याचा आरोप
कंपनीत आगीने रौद्ररूप धारण केल्याने नाशिक जिल्हयासह इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातून दूरवरुनही आगीचे लोळ दिसून येत होते. या घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. मात्र कंपनी प्रशासन माहिती लपवत आहे असा आरोप माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी केला आहे. या कंपनीत जवळपास सात हजार परप्रांतीय कामगार काम करत असून स्थानिक कामगारांना कामावर घ्यावे यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र कंपनी प्रशासन नेहमी दुर्लक्ष करीत आहे. जळीत दुर्घटनेची उच्चस्तरामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी काशिनाथ मेंगाळ यांनी केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या प्रकाराने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत. कंपनीच्या परिसरात कामगार व नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. कंपनीच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरल्याचे चित्र दुरवरून आजही दिसत होते.
हेही वाचा :
- पुणे : खवय्यांचा मांसाहारावर ताव; मासळी, मटण, चिकनच्या दुकानांवर गर्दी
- वर्धापनदिन विशेष : भारतीय अर्थव्यवस्थेचे युगांतर
- Nashik Leopard : बिबट्यासंगे सहजीवनाचा नवा अध्याय
The post Nashik : इगतपुरी स्फोट : मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता, कामगार मंत्र्यांनी व्यक्त केली भीती appeared first on पुढारी.