Site icon

Nashik : ईशान्येश्वर मंदिरात हात अथवा कुंडली पाहिली जात नाही, संस्थानचे स्पष्टीकरण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
श्री शिवनिका संस्थान न्यासाचे मंदिर स्थापनेपासून कधीही कोणाचाही हात पाहिला जात नाही किंवा कोणाचीही कुंडली पाहिली जात नाही, असे स्पष्ट करित मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानचे सरचिटणीस नामकर्ण आवारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे भविष्य पाहिल्याच्या वृत्ताचे खंडन केले.

श्री सिद्ध क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर देवस्थान व न्यासाचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या नावाने प्रसारित होणार्‍या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. श्री ईशान्येश्वर मंदिर देवस्थान येथे बुधवारी (दि. 24) दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्निक दर्शनासाठीच आले होते. ते इतर मंत्र्यांसमवेत दर्शनासाठी या मंदिरात आले होते, असेही आवारे यांनी म्हटले आहे.  मंदिर देवस्थानाविषयी गैरसमज पसरवू नये व सामान्य जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री शिवनिका संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर आहेत विश्वस्त

श्री ईशान्येश्वर मंदिर देवस्थान व न्यासाचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात खरात असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विश्वस्त आहेत. सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे हे या न्यासाचे सरचिटणीस आहेत. सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरेही विश्वस्त आहेत. जवळपास सात लोकांचा या विश्वस्त मंडळात समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कुटुंबीयांनीही यापूर्वी घेतले दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कुटुंबीयांसह माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे आशिष शेलार यांच्यासह राज्यभरातील आमदार, खासदार, उद्योजक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शिक्षणमंत्री दीपक केसरकर 15 दिवसांपूर्वीदेखील दर्शनासाठी आलेले होते.

हेही वाचा :

The post Nashik : ईशान्येश्वर मंदिरात हात अथवा कुंडली पाहिली जात नाही, संस्थानचे स्पष्टीकरण appeared first on पुढारी.

Exit mobile version