
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे सलग तिसऱ्या दिवशी नाशिकच्या पाऱ्यातील घसरण कायम आहे. रविवारी (दि.२५) शहरात ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून, गारठ्यात वाढ झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. दरम्यान, निफाडचा पारा ७ अंशांवर स्थिरावला आहे.
हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. नाशिकचा पारा थेट १० अंशांखाली घसरला आहे. परिणामी शहर-परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. विशेष करून पहाटे व रात्रीच्या वेळी गार वाऱ्याचा वेग अधिक असल्याने नागरिक गारठून जात आहेत. थंडीपासून बचावासाठी नाशिककर दिवसभर अंगात उबदार कपडे परिधान करत असून, ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी होत आहे.
निफाड तालुक्यातही थंडीचा जोर कायम आहे. पाऱ्यात झालेल्या लक्षणीय घसरणीचा फटका द्राक्षबागांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, बागा वाचविण्यासाठी तो पहाटे बागांमध्ये धूरफवारणी करतो आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही थंडीचा जोर कायम असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रब्बीच्या गहू व हरभरा वगळता अन्य पिकांसाठी हे हवामान नुकसानकारक आहे. दरम्यान, येत्या काळात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता असल्याने थंडीतही वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.
हेही वाचा :
- कर्जतला हॉटेलवर टोळक्याचा हल्ला ; सहा आरोपींना अटक
- शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, गिरीश महाजनांचा पुन्हा घणाघात
- जुन्नरच्या नागरी वस्तीतून बिबट्या जेरबंद, शहरात आढळलेला चौथा बिबट्या
The post Nashik : कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले appeared first on पुढारी.