Site icon

Nashik : कर्ज दिले 9 लाखांचे वसुल केले 50 लाख, खासगी सावकाराची मनमानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्यांपाठोपाठ व्यावसायिकही खासगी सावकारांचे बळी ठरत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील सावकाराच्या जाचाला कंटाळून दाम्पत्याने जीवन संपविले तसेच सावकाराकडून एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असताना व्यावसायिकाकडून तब्बल पाच पटीने वसुली करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे शहरासह उपनगरांतील खासगी सावकारीचा जाच संपत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक सुरेश पोराला पुजारी (५४, रा. पुष्कराज अपार्टमेंट, श्रीराम चौक, राजीवनगर, राणेनगर) यांनी संशयित विजय शंकरराव देशमुख (रा. रुंग्टा एम्पोिरया, कर्मयोगीनगर, गोविंदनगर) यांच्याकडून २००७ मध्ये १ लाख, २०१० मध्ये ४ लाख, जानेवारी २०१८ मध्ये ४ लाख रुपये असे ९ लाख पुजारी यांनी संशयिताकडून घेतले. त्यापोटी संशयिताने ५ टक्क्यांनी पैसे परत करण्यास सांगितले. त्यानुसार पुजारी यांनी २००७ ते २०२२ पर्यंत प्रतिमहिना व्याजाने पैसे परत केले. ४४ लाख ९० हजार रोख दिल्यावर उर्वरित ६ लाख रक्कम ई-स्वरूपात देण्यात आली.

संशयित देशमुख यांनी पुजारी यांच्या हॉटेलातील मॅनेजरला पैशांसाठी धमक्या दिल्या. तसेच पुजारी यांचा रस्ता अडवून पुन्हा वीस लाखांची मागणी केली. शिवाय पुजारी यांच्या मुलीला फोनवरून धमकी देत अधिक पैसे मागितले. या प्रकरणी पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलिसांत संशयित विजय शंकर देशमुख याच्याविरुद्ध खासगी सावकारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक चंद्रकांत आहिरे करत असून, संशयिताची चौकशी करून पुढील कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले.

जीवे मारण्याची धमकी

संशयित विजय देशमुख याने हॉटेल व्यावसायिक सुरेश पुजारी यांच्याकडून ९ लाखांच्या मोबदल्यात ५० लाख ९० हजार उकळले होते. त्यानंतरही संशयित देशमुखने वसुलीचा तगादा लावला. पुन्हा वीस लाखांची मागणी करत मुलीसह व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

हेही वाचा :

The post Nashik : कर्ज दिले 9 लाखांचे वसुल केले 50 लाख, खासगी सावकाराची मनमानी appeared first on पुढारी.

Exit mobile version