
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर रोडवरून इनोव्हा क्रिस्टा कार चोरी करून पसार झालेल्या तिघा चोरांना वाहनासह मध्यप्रदेशातील निमच जिल्ह्यातून गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघे चोर परराज्यातील असून त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजेश राधेशाम पंडित (३७), मनोज महेंद्र परिहार (४२, दोघे रा. उत्तरप्रदेश) व इस्माईल शब्बीर अहमद खान (३७, रा. दिल्ली) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. मयुर राजेंद्र शहाणे यांच्याकडील एमएच १५ एफयु ६४४४ क्रमांकाची कार १ ऑगस्ट रोजी रोत्री बाराच्या सुमारास गंगापूर रोडवरून चोरट्यांनी कारची काच फोडून चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पथकाने चोरट्यांच्या मागावर राजस्थान व मध्यप्रदेशात पाठलाग केला. मध्यप्रदेशातील निमच येथे विक्री करण्यासाठी कार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन कार व चोरटे यांना ताब्यात घेतले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या सुचनेनुसार सहायक निरीक्षक नितीन पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, संजय भिसे, अंमलदार गिरीष महाले, मिलींदसिंग परदेशी, रवींद्र मोहिते, मच्छिंद्र वाघचौरे, गोरख साळुंखे, सोनु खाडे आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
हेही वाचा :
- ‘ब्रिक्स’ परिषद : पंतप्रधान मोदी-चीनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये अनौपचारिक संवाद
- चांद्रयान-३ च्या यशाबद्दल BRICS परिषदेत पीएम मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव
The post Nashik : कार चोरुन पसार झालेल्या तिघांना मध्यप्रदेशातून घेतलं ताब्यात appeared first on पुढारी.